Tue, May 21, 2019 12:49होमपेज › Pune › काडीपेटी न दिल्याने माजी लष्करी अधिकार्‍याची हत्या

काडीपेटी न दिल्याने माजी लष्करी अधिकार्‍याची हत्या

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी 

कॅम्प परिसरातील डॉ. कोयाजी रोडवर सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून माजी लष्करी अधिकारी माजी अधिकारी रविंद्रकुमार बाली (65) यांच्या  खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आलेले आहे. पोलिसांनी याप्रकरणी  रॉबीनसन उर्फ रॉबीन अ‍ॅन्थोनी लाझरस (19, कर्नल तारापूर रोड, दस्तूर बॉईज हॉस्टेलजवळ कॅम्प)  या तरुणाला अटक केली असून केवळ सिगारेट ओढण्यासाठी काडीपेटी  न दिल्याच्या रागातून त्याने डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना  दि. 1 फेब्रुवारी रोजी घडली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रकुमार बाली हे कौटुंबिक कारणांमुळे कॅम्प परिसरातील डॉ. कोयाजी रस्त्यावरील पदपथावर राहत होते. तर रॉबीनसन लाझरस हा काही महिन्यांपूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करत होता. कामावरून सुटल्यानंतर रॉबीन व त्याचा मित्र कुणाल मोरे हे दोघे 31 जानेवारी रोजी केदारी पेट्रोल पंपाजवळून ओल्ड नाईन्टी नाईनजवळ असलेल्या टेकडीवर दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांचे मित्र अक्षय कांबळे, राज कांबळे असे दोघेजण तेथे आले. सर्वजण दारू पिऊन घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी रॉबीनसन याची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यानी कुणाल मोरे याचा भाऊ तेजस मोरे याला गाडी घेऊन बोलवले.

त्याप्रमाणे तेजस गाडी घेऊन तेथे आला. तिघेजण गाडीवर बसले व महंमद वाडी येथून घराकडे जात असताना त्यांच्या गाडीतील पेट्रोल मंमादेवीजवळ संपले. त्यामुळे ते गाडीला धक्का मारत पुढे जात होते. त्यावेळी रॉबीनला सिगारेट ओढायची असल्याने त्याने कोयाजी रस्त्यावर पदपथावर झोपलेल्या रविंद्रकुमार बाली यांना उठवून काडीपेटी मागितली. त्यावेळी त्यांनी त्याला काडीपेटी दिली नाही. त्यामुळे त्यांच्यात झटापट झाली आणि मारामारीही झाली. त्याच्याच रागात रॉबीनने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक उचलून दोन तीन वेळा मारला. त्यावेळी ते खाली पडले. त्यानंतर ‘अरे पत्थर से मत मारो, झगडा मत करो, लफडा हो जाएगा ’ असे म्हणून कुणाल गाडी घेऊन सरळ पळत सुटला.

त्यानंतर तिघेही तेथून पळाले. मात्र रॉबीनसन याने  केशरचना बदलली आणि तो मित्रांकडून स्वत:च्या घरातील कपडे घेऊन कोणाला कळू नये म्हणून मुंबई येथे राहण्यास गेला. रायगड जिल्ह्यातील पेंदर तळोजा येथे तो चायनीजच्या गाडीवर काम करत होता. या घटनेनंतर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर समांतर तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक संशयित मंगल विहार वंडरलँडच्या बोळातून पळत जात असल्याचे दिसले. तेथून तो टोराटोरा हॉटेल, शेजारील बोळातून ताबूत स्ट्रीट नाझ चौक, हॉटेल अरोरा टॉवर, येथून पळत जाताना दिसला. त्यानंतर त्यानेच गुन्हा केल्याची शक्यता घरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर त्याला पेंदर तळोजा येथे जाऊन अटक केली. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. 

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम मोरे, सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र बाबर, कर्मचारी अतूल साठे, संदिप तळेकर, राजू रासगे, संदिप राठोड, गुणशिंलम रंगम यांच्या पथकाने केली.