होमपेज › Pune › दररोज एक मुलगी अत्याचाराची बळी

दररोज एक मुलगी अत्याचाराची बळी

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:25AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

राज्यातील शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुण्यात दरदिवशी एक बालक वासनांधांच्या अत्याचाराचा बळी पडत आहे. वडील, भाऊ, काका, मामा, शेजारी, अशा कुटुंबातीलच अत्यंत नजिक असणार्‍या वासनांधांच्या अत्याचारांना ही बालके बळी पडत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. 

खेळण्या बागडण्याच्या वयात, जगाची नुकतीच ओळख होत असताना, या बालकांना लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातदेखील अशाच घटना दररोज घडत आहेत, त्याकडे आपण कधी डोळसपणे पाहणार आणि त्याला आळा घालण्यासाठी कशी पावले उचलली जाणार हा खरा प्रश्‍न आहे. पुण्यात समोर आलेल्या घटना या चक्रावून सोडणार्‍या आहेत. 10 एप्रिल रोजी धायरीगाव, वडगावशेरी, खराडी, औंधगाव,हडपसर येथे एकाच दिवशी अशाच दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लहान मुले वासनांध नराधमांपासून सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न समोर आ वासून उभा राहतो.

उमलत्या वयातच बालकांना एखाद्या वासनांध राक्षसाच्या वासनेचा डंख लागत आहे. चिमुरड्यांना नुकतीच या जगाची, आसपासच्या वातावरणाची ओळख होत असते. त्याच्यासाठी हे आसपासचे जगच सर्वकाही असते. अशा वेळी त्या मुलाला किंवा मुलीला, तो ज्याला काका, मामा, भाऊ, शिक्षक, मित्र मानतो; त्याच्याच वासनेला बळी पडल्याने अशा मुलांच्या मानसिक अवस्थेत होणारी घुसमट अस्वस्थ करणारी आहे. या घटनांचा दिवसेंदिवस वाढता आकडा हा सामाजिक स्वास्थ्य ठिक नसल्याचेच द्योतक म्हणावे लागेल.  त्यामुळे आपली मुले शाळा, शिकवण्या, घर आणि घराच्या आसपास सुरक्षित आहेत का, कल्पनेने पालकांच्या अंगावर काट उभा करतो आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत, सुधारणावादी आणि पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या शहरामध्ये मागील सहा  वर्षांचा या घटनांचा आढावा घेतल्यास बाल लैंगिक अत्याचाराचा आकडा चिंताजनक आहे. 

मागील सहा वर्षात पुण्यातील तब्बल दोन हजार मुलामुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. भितीने पिडीत मुले मुली त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची वाच्यताच करत नाहीत. काही वेळा तर आईजवळ मन मोकळं करणारी मुलं गप्प गप्प राहिल्याने आलेल्या संशयातून हे प्रकार उघडकिस आले आहेत. 

मागील तीन वर्षात हे प्रकार आई वडीलांनी दाखविलेल्या धाडसामुळे समोर येत आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.2015 मध्ये 355, 2016 मध्ये 347, तर 2017 मध्ये 403 मुलांवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर 2018 मध्ये फेब्रुवारीपर्यंत 64 बालकांवर अत्याचार झाले आहेत. दरदिवशी एक बालक अत्याचारांना बळी पडत असल्याचेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. 

पुण्यातील घडणार्‍या अमानुष घटनांमुळे या सर्व मुलामुलींच्या जडणघडणीवर  आणि त्यांच्या पुढील वाटचालीवरील होणारा परिणाम चिंताजनक आहे.