Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Pune › पूर्व‘पीसीएमटी’च्या कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत घेणार कधी ?

पूर्व‘पीसीएमटी’च्या कर्मचार्‍यांना महापालिका सेवेत घेणार कधी ?

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:54PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पुणे परिवहन महानगर (पीएमपीएमएल) मध्ये कार्यरत पूर्व पीसीएमटीतील 178 कर्मचार्‍यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत घेण्याचा प्रस्ताव रेंगाळत पडला आहे.  प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. महिनाभराच्या कालावधीत ते कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होतील, अशी माहिती आयुक्त  श्रावण हर्डीकर यांनी महिनाभरापूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली होती.  मात्र अद्याप हे प्रकरण मार्गी लागलेले नाही.   आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘पीएमपीएमएल’ ला या कर्मचार्‍यांवरच्या पगारावर  50 ते 60 लाख रुपये खर्च करावे लागत असल्याने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी कर्मचार्‍यांची अपेक्षा आहे. 

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहनकडील (पीसीएमटी) अतिरिक्त ठरणारे 222 कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएटीकडून वर्ग करण्यात आले होते.  या कर्मचार्‍यांच्या पगाराची रक्कम पिंपरी- चिंचवड महापालिका ‘पीएमपीएमएल’ ला देत होती. 

या 222 कर्मचार्र्‍यांपैकी 44 कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे ही संख्या 178 वर आली. या कर्मचार्‍यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ला नितांत गरज असल्याने ‘पीएमपीएमएल’ कडे वर्ग करावे,  असे पत्र पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला दिले होते. तत्कालीन पालिका आयुक्तांनी या कर्मचार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त केले होते. त्यानंतरही काही कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले नव्हते. मुंढे यांनी ‘पीएमपीएमएल’ मध्ये रुजू न झाल्यास कामावरुन कमी करण्याचा इशारा देताच कर्मचारी रुजू झाले होते. तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नयना गुंडे संचालक म्हणून आल्या आहेत. 

‘पीएमपीएमएल’मध्ये रुजू झालेल्या या 178 कर्मचार्‍यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करुन घेण्यासाठी आमदार, महापौर, नगरसेवकांकडे फिल्डिंग लावली होती. 

त्यानुसार महापालिका प्रशासनातही हालचाली सुरु झाल्या.   या कर्मचा-यांना पालिकेत  रुजू करुन घेण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. महिन्याभरानंतर ते कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होतील, असे आयुक्त  श्रावण हर्डीकर यांनी मागील महिन्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.  मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नसल्याने या कर्मचार्‍यांच्या पगारासाठीचा आर्थिक बोजा पीएमपीएमएलला सहन करावा लागत आहे.