Tue, Nov 20, 2018 06:02होमपेज › Pune › अखेर लग्न सोहळ्यात झाला निवेदकाचा सत्कार 

अखेर लग्न सोहळ्यात झाला निवेदकाचा सत्कार 

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:42PMवडगाव मावळ  : वार्ताहर 

लग्न सोहळ्यास उपस्थित राहणार्‍या राजकीय पुढार्‍यांचे सोपस्कार पूर्ण करणार्‍या निवेदकांवरच अनेकदा खापर फोडले जाते. यासंदर्भात ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेऊन वडगाव मावळ येथे झालेल्या एका लग्न सोहळ्यात निमंत्रित चोपडे, ढोरे व विनोदे या परिवाराकडून अखेर सर्वप्रथम निवेदकाचा सन्मान करण्यात आला.दै.पुढारीने शुक्रवार दि.11 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तामध्ये लग्न सोहळ्यांमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणार्‍या निवेदकांची होणारी घुसमट, अवहेलना यासंदर्भात निवेदकांची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला होता.

यामध्ये प्रामुख्याने जवळपास दोन तास तोंडाला फेस येईपर्यंत प्रत्येकाचे पदासह नामोल्लेख करून शाब्दिक स्वागत करण्याबरोबरच जावई सन्मान, मध्यस्थी सन्मान, स्वागत, शुभाशीर्वाद व उपस्थित राजकीय व्यक्ती यांचा ताळेबंद करण्याची जबाबदारीही निवेदक पूर्ण करतात. परंतु, यामध्ये कोणाकडून तरी राजकारण केले जाते आणि याचे खापरही निवेदकांवरच फोडले जाते.मानधन किंवा कुठल्याही बिदागीची अपेक्षा न ठेवता शहरी भागासह ग्रामीण भागात स्वत:ची पदरमोड करून निवेदक मंडळी विविध लग्न समारंभांना हजेरी लावून आपली जबाबदारी पूर्ण करतात. एवढे करूनही संबंधीत निवेदकाचा सत्कार तर सोडाच, साधा नावाचाही उल्लेख होत नाही. उलट एखाद्याचे नाव राहिल्यास त्याची नाराजीही ओढवून घ्यावी लागते. अशा प्रकारे निवेदकाची अवहेलना होत असल्याचे दै. पुढारीने निदर्शनास आणून दिले होते.

यासंदर्भात सोशल मीडियावरही चांगली चर्चा रंगली होती, दरम्यान, लगेचच दुसर्‍या दिवशी दि.12 वडगाव मावळ येथील पूजा गार्डन मंगल कार्यालयामध्ये चोपडे, ढोरे, विनोदे या परिवारातील चार वधू-वरांचा शुभविवाह पार पडला, सबंधीत परिवाराने दै.पुढारीच्या वृत्ताची दखल घेवून त्या लग्नामध्ये निवेदकाचे काम करणार्‍या निवेदकाचा पोशाख देवून सन्मान केला. असाच सन्मान सर्वच निवेदकांचा व्हावा अशी अपेक्षा सबंधीत निवेदकाने व्यक्त केली.

निवेदकांना कुठल्याही सत्काराची अथवा आर्थिक मोबदल्याची अपेक्षा नाही. परंतु, तोंडाला फेस येईपर्यंत प्रत्येकाचे स्वागत करुनही स्वागत, शुभाशिर्वाद करणारे नेतेही निवेदकाचा फक्त ‘संयोजकांनी स्वागत केलेच आहे‘ असा एकेरी उल्लेख करुन एकप्रकारे निवेदकाची अवहेलना करतात, त्याऐवजी त्याच्या नावाचा उल्लेख करुन निवेदकांना सन्मानाची वागणूक द्यावी इतकीच अपेक्षा तालुक्यातील निवेदकांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.