Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Pune › अखेर दापोडी-निगडी ‘बीआरटी’ मार्गावर बस धावली

अखेर दापोडी-निगडी ‘बीआरटी’ मार्गावर बस धावली

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 10:15PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (दि. 24) अखेर पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते  झेंडा दाखवून निगडीतून बीआरटी मार्गावर बससेवा सुरू झाली.  तसेच निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनसचेदेखील उद्घाटन करण्यात आले. 

या वेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण  हर्डीकर, स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, पीएमपीएलच्या व्यस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने,  दीपक पाटील, संजय काशिद, संजय साळी, बाळासाहेब शेटे आदी उपस्थित होते.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टिम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला होता. सन 2013 मध्ये बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या नसल्याचे कारण देत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करुन याचिकाकर्त्यांसोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावली झाली. न्यायालयाने बीआरटीएस बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शविला होता. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या  बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर शुक्रवार पासून मार्गावर बस सुरु केली आहे. दोन महिन्यांनंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्यात येणार आहे.

या मार्गावरून 273 बस धावणार आहेत. एका दिवसाला 2200 ते 2300 फेर्‍या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. पीएमपीच्या 113 गाड्या, तर भाडेतत्त्वावरील 139  गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील 21 गाड्या अशा एकूण 273 गाड्या या मार्गावर धावतील. 

सध्या या मार्गावरून धावणार्‍या काही जुन्या गाड्या अन्य मार्गांवर पाठविल्या जातील. बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात आली असून इतर वाहनांना परवानगी नाही. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.

पालकमंत्र्यांची दांडी 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दापोडी- निगडी बीआरटी मार्गाचे उद्घाटन होणार होते. मात्र त्यांनी दांडी मारली.