Wed, Apr 24, 2019 02:13होमपेज › Pune › जागतिक बाल कामगार विरोधी दिन : आजही होणार का बालकामगार विरोधी दिनाचा ‘इव्हेंन्ट’

जागतिक बाल कामगार विरोधी दिन : आजही होणार का बालकामगार विरोधी दिनाचा ‘इव्हेंन्ट’

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:25AM-नरेंद्र साठे 

सरकारी यंत्रणा, सामाजिक संघटना आज बालकामगार विरोधी दिनाचा ‘इव्हेंन्ट’ साजरा करतील पण, खरंच यामुळे बालकांना कामावर जुंपण्याचे प्रकार थांबतील का, हा प्रश्‍न आहे. ज्यांना गरीबीमुळे काम करण्याशिवाय पर्याय नाही, त्यांचे काय, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र मिळणार नाही. म्हणून या बालकामगार विरोधी दिनाच्या निमित्ताने ‘पुढारी’ने या प्रश्‍नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव पुढे आले.

पुण्यामध्ये अनेक ठिकाणी बालकामगार काम करताना दिसून येतात. मात्र, यातील बहुतांशी मुलांवर केवळ परिस्थितीमुळेच काम करण्याची वेळ येत असल्याचे दिसून आले. राज्य व परप्रांतातील अनेक गरीब कुटुंबातील मुले विविध ठिकाणी कामे करतात. यामध्ये कोणी केटरिंगच्या कामासाठी हजेरीप्रमाणे जातात, सिग्नलवर विविध वस्तू विकतात, हॉटेल, दुकानांमध्ये मिळतील ती छोटी-मोठी कामे करतात.

उत्तर प्रदेशहून आलेल्या जितेंद्र (नाव बदलले आहे.) व त्याच्या मोठ्या भावाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात त्याच्या गावाकडील मुलांच्या सहाय्याने एक गाडी भाडे तत्त्वावर घेऊन चहाचा व्यवसाय सुरू केला. जितेंद्र सारखी शहरामध्ये अनेक मुले आहेत, ज्यांना त्यांची परिस्थिती काम करण्यास भाग पाडत आहे. त्यांनी काम नाही केले तर त्यांचे कुटुंब चालणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र, कायद्याप्रमाणे ते चुकीचे आहे. यावर जितेंद्र म्हणतो कायद्याप्रमाणे चुकीचे असेल, पण माझे कुटुंब जगणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.   त्यामुळे जितेंद्रसारख्या अनेक मुलांपर्यंत योग्य सुविधा पोचल्या, तर बालकामगार म्हणून काम करण्याची वेळ येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

धोरण बदलण्याची गरज

बालकामगारांसाठी कार्य करणार्‍या आर्क या संघटनेचे अविनाश मधाळे म्हणाले, बालकामगार हे सराकरचे अपयश आहे. बालकामगार कमी करण्याची किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी केवळ पालक आणि संस्थावर न टाकता, शासनाचीही तेवढीच जबाबदारी आहे.  सध्याची आहे ती परिस्थिती मान्य करून, कमवा आणि शिका सारखी योजना विद्यापीठ पातळीवर राबवली जात आहे. अशी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. रात्र शाळासारख्या यंत्रणा उभ्या करणे आवश्यक आहे.  

कायद्याची अंमलबजावणीच नाही

माजी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मच्छिंद्र सुतार म्हणाले, बालकामगारांवर कारवाई केल्यानंतर, त्या मुलांच्या भविष्यासाठी काळजी आरखडा तयार केला जातो. कायद्यात सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे अमंलबजावणी केली तर त्याच्या कुटुंबाला देखील मदत करता येते. कारवाई करणे, दंड करणे एवढेच केले जाते. त्यानंतर त्यांना योग्य शिक्षण देऊन, पुढेही सहकार्य करणे गरजेचे आहे. संबंधित खात्यामध्ये परस्पर समन्वय नाही.  

सर्व्हेक्षण काय सांगते? 

बाल हक्क कृती गट, (आर्क)यांनी आपल्या 7 सदस्य संस्थांच्या सहकार्यातून एक सेर्वेक्षण केले. यामध्ये 46 % बालकांना आपले आई वडील जे काम करतात, तेच काम आपण करण्यात काही चूक वाटत नाही; तर 50% बालकांना ते चुकीचे वाटते 4% बालक या विषयी काही निश्चिती सांगू शकली नाहीत. या विषयी अधिक संशोधनाची आणि अधिक शास्त्रशुद्ध कारणमिमांसेची गरज आहे.