Thu, Jul 18, 2019 16:59होमपेज › Pune › एक हजार कोटी खर्चूनही नद्या अस्वच्छच राहणार

एक हजार कोटी खर्चूनही नद्या अस्वच्छच राहणार

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMपुणे : पांडुरंग सांडभोर

महापालिकेच्या नदी संवर्धन प्रकल्पामुळे मुळा-मुठा नद्यांमधून स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, ही पुणेकरांची आशा फोल ठरणार आहे. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, त्यात समाविष्ट गावांचे नियोजनच करण्यात आलेले नाही. त्यामुळे एक हजार कोटी खर्च करूनही या नद्या अस्वच्छच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या नद्यांना अक्षरश: गंटारगंगेचे स्वरूप आले आहे. प्रामुख्याने महापालिका हद्दीत 744 एमएलडी मैला पाणी तयार होते. त्यामधील केवळ 567 एमएलडी मैला पाण्यावरच प्रक्रिया होते, उर्वरित मैला पाण्यावर प्रक्रिया न होताच थेट नदीत सोडले जात असल्याने या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने नदी सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 2027 पर्यंतचे 100 टक्के मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीने केंद्र सरकारच्या माध्यमातून 990 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्या योजनेचा आराखडा तयार करून आता प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. 2022 पर्यंत हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. मात्र, हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर मुळा-मुठ्या नद्या अस्वच्छच राहणार आहेत. कारण ही योजना राबविताना पालिकेत समाविष्ट होऊ घातलेल्या गावांमधील मैला पाण्याचा विचारच करण्यात आलेला नाही. त्यामधील या गावांचे मैला पाणी थेट पुन्हा नद्यांमध्ये मिसळून नद्या अस्वच्छच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून ही कबुली देण्यात आली आहे.

पुढील तीन वर्षात महापालिकेत एकूण 35 गावे समाविष्ट होणार आहेत. त्यामधील 11 गावे गतवर्षीच पालिकेत आली आहेत. त्यामध्ये लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरा नळी), शिवणे (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा समावेश आहे. मात्र, नदी सुधारणा प्रकल्पात या गावांमध्ये तयार होणार्‍या मैला पाणी शुद्धीकरणाचे नियोजन नाही. त्यामुळे प्रामुख्याने केशवनगर, उरुळी देवाची फुरसुंगी, लोहगाव, त्याचबरोबर शिवणे या गावांचे मैला पाणी थेट नदीत मिसळणार आहे. त्यामुळे नद्या पुन्हा अस्वच्छच दिसणार आहेत. पुढच्या टप्यात उर्वरित गावे समाविष्ट झाल्यावर त्यात अधिक भर पडण्याची भीती आहे. दरम्यान गावे पालिकेत येण्याआधीच त्याचे नियोजन करणे अशक्य असल्याने गावांचा विचार या प्रकल्पात करता आलेला नसल्याची स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

खडकी, पुणे कॅन्टोमेन्टचे मैला पाणीही मिसळणार

एकीकडे महापालिकेने शहरातील शंभर टक्के मैला पाण्याच्या प्रकियेचे नियोजन केले आहे. मात्र, शहरातच मोडणार्‍या पुणे कॅन्टोमेन्ट आणि खडकी कॅन्टोमेन्ट यांच्या हद्दीतील मैला पाणी प्रक्रिया न होताच नदीत मिसळणार आहे. त्यामुळेही या नद्यांची अस्वच्छता कायम राहणार आहे.

11 गावांचा मास्टर प्लॅन

मैला पाण्याच्या लाईन, त्याचे शुद्धीकरण प्रकल्प कुठे आणि किती असावेत यासाठी मास्टर प्लॅन करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यास स्थायीने मंजुरी दिली आहे. मात्र, हा प्लॅन तयार झाल्यानंतर तो प्रत्यक्ष राबविण्यासाठी त्यावर पुन्हा खर्च करावा लागणार आहे.