Wed, Nov 21, 2018 01:06होमपेज › Pune › सात महिन्यांनंतरही नाही रात्रशाळेत पर्यायी शिक्षक

सात महिन्यांनंतरही नाही रात्रशाळेत पर्यायी शिक्षक

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:25AM

बुकमार्क करा
पिंपरी : वर्षा कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव चिंचवड येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील सात महिन्यांपूर्वी  दुबार नोकरी करीत असलेल्या मुख्याध्यापक, लिपिक, 3 शिक्षक, 2 सेवक असे सात जण कमी केले होते. या ठिकाणी दहा शिक्षक गरजेचे असताना मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. सात महिने उलटूनही पर्यायी शिक्षक दिले नसल्यामुळे रात्रशाळेत शिकणार्‍या गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. 

राज्यभरातील रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या 1456 शिक्षकांची सेवा शासनाने मे 2017 मध्ये एक परिपत्रक काढून संपुष्टात आणली. त्याला सात महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. दोन-अडीच महिन्यांवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा आली असताना त्यांना शिकवायला शासनाने शिक्षकच दिलेले नाहीत. रात्रशाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती, दोन वेळच्या जेवणाची आबाल, या सर्व कारणांमुळे  लहान वयातच घराची आर्थिक बाजू सांभाळावी लागते आणि हे करत असताना शिक्षण राहून जाते  व शिकण्याचे स्वप्न अर्धवट राहते. हे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रशाळा हा या विद्यार्थ्यांना एकमेव आधार आहे.  दिवसभर काम करून आणि रात्री रात्रशाळेत शिकून आपल्या स्वप्नांना उभारी देण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात; मात्र या ठिकाणी शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थी कसे घडतील हा प्रश्‍न आहे. 

रात्रशाळांमध्ये जादा जे शिक्षक दिले आहेत त्यांनाही त्यांचे विषय न देता भलतेच विषय शिकविण्यास सांगितले जाते. उदा. मराठी विषयाचा शिक्षक असेल, तर त्यास इंग्रजी विषय शिकविण्यास सांगितले जाते; तसेच जे कामकाज पाहतात ते अनुभव नसलेले शिक्षक आहेत. फक्त डी. एड. झालेले पर्यायी शिक्षक देण्यात आले आहेत. एकाही बी.एड. झालेल्या शिक्षकाला सेवेत घेतले नाही; तसेच सरप्लसमध्ये घेतलेल्या शिक्षकांना अत्यंत कमी पगार असल्यामुळे हे शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मीयतेने शिकवितात असे नाही.

यामुळे  रात्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा घसरत आहे. किमान बी.एड. झालेल्या आणि शिकविण्याची तळमळ असलेल्या शिक्षकांना तरी रात्रशाळेत सेवेत घ्यावे, अशी मागणी रात्रशाळांचे मुख्याध्यापक करत आहेत. अशाप्रकारे पर्यायी शिक्षक उपलब्ध करून न देता हळूहळू रात्रशाळा बंद पाडण्याचा शासनाचा कल आहे का? रात्रशाळा बंद झाल्या तर आर्थिक दुर्बल घटकातील शिक्षणाला वंचित ठरलेल्या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे, असा प्रश्‍न रात्रशाळेतील शिक्षक करताना दिसत आहेत. शासनाच्या निर्णयामुळे राज्यभरातील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. 
शिक्षकेतर कर्मचारीही नाहीत

शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती केली नसल्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे काम करावे लागते. शाळेमध्ये  प्रवेशाचे दाखले देणे; तसेच 10 वी व 12 वी बोर्डाच्या पुनर्परीक्षेचे अर्ज भरताना शिक्षकांचीच दमछाक झाली. यामुळे साहजिकच दाखले लिहिताना चुका होतात;  तसेच इतर शालेय कामांनाही दिरंगाई होते. याबाबत शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.