Thu, Nov 15, 2018 08:14होमपेज › Pune › नागरी बँकांसाठी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापणार

नागरी बँकांसाठी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापणार

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:20AMपुणे ः प्रतिनिधी

देशात नागरी सहकारी बँकांचे जाळे विखुरलेले असून, सामान्य नागरिकांचा कल या बँकांकडे कायम आहे. या बँकांच्या संरक्षणासाठी एकाच छताखाली संघटनांच्या (अंब्रेला ऑर्गनायझेशन) स्वरूपात पुनरुज्जीवन निधी व आवश्यक बँकिंग सेवा पुरविणारी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापन होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच पावले उचलण्यात येणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) 18 डिसेंबर 2017 च्या स्थायी सल्लागार समितीमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार नागरी बँकांसाठी राष्ट्रीय पातळीवर संघटना स्वरूपात एका स्वतंत्र वित्तीय संस्थेच्या स्थापनेसाठी आरबीआय गेल्या 10 वषार्र्ंपासून प्रयत्नशील आहे. त्यांच्याच सूचनेनुसार नॅशनल बँकिंग फेडरेशनने आरबीआय बँकेचे निवृत्त कार्यकारी संचालक व्ही. एस. दास यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी एक तज्ज्ञ समितीची नियुक्‍ती केली होती. 

त्यामध्ये आरबीआयचे आणखी एक निवृत्त कार्यकारी संचालक एस. करुअप्पास्वामी, बँकिंग नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नॅशनल फेडरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. कृष्णा यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

संभाव्य स्थापन होणार्‍या वित्तीय संस्थेत 51 टक्के शेअर हे नागरी बँकांचे असतील. तर उर्वरित शेअर बाजारात विक्रीला उपलब्ध केले जाऊन आरबीआयचे संस्थेवर पूर्णपणे नियंत्रण राहील. अडचणीतील बँकांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी अल्प व्याजदराने व्यवसाय करण्यासाठी निधी देण्याचे काम ही संस्था करेल. त्यामुळे नागरी बँकांकडे ठेवीदारांचा कल वाढेल. - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन