Fri, Jul 19, 2019 07:26होमपेज › Pune › माजी सैनिक हो, तुमच्यासाठी...

माजी सैनिक हो, तुमच्यासाठी...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : नरेंद्र साठे

सैनिकांचा ऐन उमेदीचा काळ देशासाठी सेवा करण्यात जातो. निवृत्त झाल्यानंतर शेती सांभाळून जवळच्या शहरात एखाद्या खासगी संस्थेत सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करणे, आतापर्यंत सुरू असलेला हा सैनिक ते माजी सैनिक प्रवास आता काहीसा बदलताना दिसतोय. यासाठी प्रयत्न केलेत ते महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाने (मेस्को). मेस्कोने खास माजी सैनिकांसाठी भोसरी एमआयडीसीमध्ये महासैनिक इंडस्ट्रियल इस्टेटची उभारणी केली. यामध्ये माजी सैनिकांना उद्योगांसाठी गाळे उपलब्ध करून दिले जात आहेत. माजी सैनिकांसाठी सुरू झालेली ही पहिली इंडस्ट्री आहे.

साधारण 2009 साली मेस्कोच्या काही अधिकार्‍यांनी यासंदर्भात एकत्र येऊन संकल्पना पुढे आणली. त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्षात इंडस्ट्रीजच्या उभारणीस सुरुवात झाली. सध्या भोसरी एमआयडीसीतील टी 153/1 या प्लॉटमध्ये अडीच एकरात महासैनिक इंडस्ट्रियल इस्टेटची भव्य इमारत माजी सैनिकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या प्रकल्पासाठी मेस्कोने 30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

तसेच महाराष्ट्र शासनाने 10 कोटी आणि केंद्र शासनाने 5 कोटी 30 लाखांची गुंतवणूक केली. सध्या या इस्टेटमध्ये 120 गाळे तयार आहेत. तर त्यापैकी 28 गाळ्यांमध्ये प्रत्यक्षात माजी सैनिकांनी त्यांचा व्यवसाय देखील सुरू केला आहे. 28 उद्योजकांपैकी काही उद्योजक हे अगदी नव्यानेच या क्षेत्रात उतरलेत. तर काही माजी सैनिकांनी अनुभवी उद्योजकांना सोबत घेऊन उद्योग क्षेत्रात प्रवेश केला आहे. सैन्यातील निवृत्तीनंतर माजी सैनिक कोट्याचे आरक्षण मिळते. निवृत्तीनंतर लगेच नोकरी मिळत नसल्याने अनेकांना सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागते. त्यामुळे आता माजी सैनिकांनी देखील उद्योजक बनले पाहिजे असे मेस्कोचे धोरण आहे.

या इस्टेटमधील 120 गाळ्यांपैकी 100 गाळे हे माजी सैनिकांना उद्योगासाठी देण्यात येणार आहेत. 10 गाळ्यांमध्ये मेस्को स्वतः मॅनिफॅक्‍चरिंग करणार आहे. याला ‘कॉमन फॅसीलिटी सेंटर’ असे नाव देऊन त्याठिकाणी उपलब्ध असणार्‍या मशिनरींचा वापर इस्टेटमधील इतर उद्योजकांना करता येईल. या कॉमन फॅसीलिटी सेंटरसाठी 90 टक्के गुंतवणूक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय करणार असून इस्टेटमधील उद्योजक 10 टक्के गुंतवणूक करणार आहेत.

ज्या उद्योजकांकडे ऑर्डर आहे, मात्र त्या क्षमतेच्या उच्च दर्जाच्या मशिनरी उपलब्ध नाहीत अशा उद्योजकांना कॉमन फॅसीलिटी सेंटरमध्ये तासिकां तत्त्वावर दर आकरून मशिनरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाकी 10 गाळ्यांमध्ये मेस्कोच्या वतीने उद्योजकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये एका बॅचमध्ये 60 उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचा मानस महासैनिक इंडस्ट्रियल इस्टेटचा आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये प्रशिक्षण केंद्र एका खासगी संस्थेच्या सहाय्याने सुरू करण्यात येणार आहे.

आयटी विभाग देखील सज्ज...

शंभर गाळे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यांना आयटीसंदर्भातील कामाची अडचण येऊ नये म्हणून मेस्कोने स्वतःचा आयटी विभाग सुरू केला आहे. या आयटी विभागातून मेस्कोची कामे तर केली जातातच, याबरोबरच इतर गाळेधारकांना देखील आयटी विभाग फायदेशीर ठरत आहे. वेबसाईट बनविण्यापासून ते इतर सॉफ्टवेअरच्या संदर्भातील कामे या आयटी विभागाकडून केली जात आहेत. सैनिकांना उद्योजक कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे. उद्योजकांना बँक सुविधा, मशिनरी, कच्चा माल सवलतीच्या दरात मिळणे, प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक प्रशिक्षण आदी बाबी उपलब्ध करून देण्यात येतील. 

उद्योजक म्हणातात... येथे सेफ्टी मिळते

एमआयडीसी भागांमध्ये गेली काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु त्या तुलनेत हा परिसर माजी सैनिकांचा असल्याने येथे कोणी चोरी करण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे या ठिकाणी काम करताना सेफ्टी मिळते, त्याच बरोबर महिला कामगार असतील तरीदेखील त्यांच्या सुरक्षिततेचा विचार मेस्को करते. मेस्कोची टीम सतत पाहणी करून माहिती घेत असते. आमचा प्लास्टिक आणि रबर मोल्डिंगचा उद्योग सुरू केला आहे.आमचा संबंध अ‍ॅटोमोबाईल कंपनी, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांशी येतो. याठिकाणी व्यवसाय सुरू केल्यापासून चांगला फायदा होत आहेच, त्याचबरोबर मेस्कोमुळे नवउद्योजकांना चांगले व्यासपीठ मिळत असल्याची माहिती थ्री ए इंडस्ट्रिजचे पुरुषोत्तम ठाकूर आणि सुनील ठाकूर सांगत होते.

सैनिकांची शिस्त दिसणार...

एमआयडीसीमध्ये इतर ठिकाणी असलेल्या लघु उद्योगांमध्ये तुम्हाला स्वच्छता किंवा कामगारांमध्ये शिस्त दिसून येणार नाही. परंतु महासैनिक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या माजी सैनिकांच्या लघु उद्योगांमध्ये सैन्यांना असलेल्या शिस्तीची प्रचिती येते. संपूर्ण परिसर त्याचबरोबर उद्योगाचा गाळा यामध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्यावर उद्योजकांचा भर असल्याचे दिसून येते.