Thu, Mar 21, 2019 11:46होमपेज › Pune › पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापणार

पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापणार

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 1:00AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

महापालिकेच्या शिक्षण समिती स्थापनेस विधी समितीने मान्यता दिली आहे; मात्र सदर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत तहकूब करण्यात आला. पुणे महापालिकेच्या धर्तीवर कार्यकर्त्यांची संख्या चारवरून अधिक करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  

स्थानिक स्वराज्य संस्थाशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आल्याने, राज्यातील सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. पालिकेतील शिक्षण मंडळाचा कार्यकाल 1 जून 2017 ला संपला. 

आयुक्तांच्या 2 जून 2017 च्या आदेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले आणि मंडळाच्या अधिपत्याखालील मालमत्ता व कर्मचारी आयुक्तांनी स्वत:च्या अधिकार कक्षेत घेतले.शिक्षण मंडळाऐवजी विविध विषय समित्यांप्रमाणे शिक्षण समिती स्थापनेच्या हालचाली सत्ताधार्‍यांनी सुरू केल्या आहेत. त्यानुसार विधी समितीमध्ये 9 नगरसेवकांसह 4 शिक्षण क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी अशा एकूण 13 सदस्यांची समिती  बनविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होतो. समितीने शिफारस करून तो मंजुरीसाठी पालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता; मात्र 28 नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत सदर विषय सत्ताधार्‍यांनी अचानक तहकूब केला. त्यामुळे शिक्षण समिती स्थापनेचा विषय पुढे ढकलण्यात आला आहे. 

दरम्यान, पुणे पालिकेच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. पक्षाच्या अधिकाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून चारवरून ही संख्या अधिक केली जाणार आहे. 

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थेत किमान तीन वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती असावा, अशी सदस्य निवडीची अट आहे. त्यानुसार पक्षाचे अधिकाधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिक्षण समिती सदस्य म्हणून निवड करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली भाजपचा आहेत. त्यानुसार नव्या प्रस्तावाला येत्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या वतीने स्थापन करण्यात येणार्‍या शिक्षण समितीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण समिती गठित केली जाणार आहे. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. 

दोन्ही महापालिकांत एकसारखी सदस्यांची समिती गठित केली जाईल. नगरसेवकांच्या संख्येसोबत पदाधिकार्‍यांची संख्या वाढविण्याचा विचार आहे. त्यामुळे समितीवर अनेकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.