Sat, Apr 20, 2019 18:30होमपेज › Pune › सामुदायिक विवाहासाठी समितीची स्थापना

सामुदायिक विवाहासाठी समितीची स्थापना

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी

शेतकरी, कष्टकरी जनतेला मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चासाठी कर्ज काढावे लागते. तेच कर्ज फेडता-फेडता त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. म्हणून त्यांना कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील न्यासांच्या मदतीने ‘सामुदायिक विवाह अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात इच्छुक जोडप्यांचे विवाह मोफत लावून देण्यात येणार आहेत. 

या अभियानाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला विविध देवस्थाने, शैक्षणिक, सामाजिक न्यासांचे विश्‍वस्त उपस्थित होते. यामध्ये जिल्हा स्तरावर ‘पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या 21 सदस्यांच्या समितीमध्ये विश्‍वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते सहभाग घेऊ शकतात. इच्छुकांनी येत्या पाच दिवसांत सहधर्मादाय कार्यालयाकडे नावे द्यावीत, असे अवाहन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.

या बैठकीला दगडूशेठ हलवाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, जेजुरी, चतु:शृंगी, भीमाशंकर,  चिंचवडचे मोरया देवस्थान, सिंबायोसिस व इतर नामांकित संस्थांचे विश्‍वस्त उपस्थित होते. त्यांनी या अभियानाला पाठिंबा दिला. 

याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी 26 तारखेला राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक बैठक होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त नवनाथ जगताप यांनी केले. मुख्य भाषण सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. या वेळी उपायुक्त एस. एम. गोडसे, सहायक आयुक्त साजिद रचभरे, अधीक्षक के. डी. शिंदे, अधीक्षक सुनिता तिकोणे उपस्थित होते.

अशी आहे ही योजना

मुलाचे वय 21 व मुलीचे 18 पूर्ण हवे
दोघांच्या आईवडिलांची संमती आवश्यक
तीन ग्रॅमचे मंगळसूत्र व संसार देण्याचा विचार
सर्व जाती, धर्मांच्या रिवाजानुसार विवाह