Tue, Jul 16, 2019 22:09होमपेज › Pune › सलग बारा तास वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा आनंद

सलग बारा तास वारकर्‍यांनी लुटला कीर्तनाचा आनंद

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी

विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल... विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... ज्ञानोबा माउली तुकारामचा अखंड गजर... टाळमृदंगाच्या ठेक्यावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला वारकरी वर्ग अशा भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या गजराने लाल महाल दुमदुमून गेला. सलग 12 तासांच्या या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाईंचे अभंग ऐकताना वारकरी दंग झाले. 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ भक्ती-शक्ती एकात्म नाम सोहळा अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर गणेशदादा टोकेकर, सुरेश तरलगट्टी, ज्ञानदेव म्हसणे उपस्थित होते. सकाळी कीर्तनमालेची सुरूवात ह.भ.प. न. चिं. अपामार्जने यांच्या कीर्तनाने झाली. अपामार्जने म्हणाले, संत हे विवेक देणारे आहेत. संतांनी हजारो लोकांपर्यंत समाधान पोहोचविले आहे. खरे समाधानी आणि आनंदी व्हायचे असेल तर वारीमध्ये सहभागी व्हावे. परंतु, सगळ्या चिंता विसरून संपूर्ण चित्त हे पांडुरंगाच्या स्मरणात असावे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ह.भ.प. उज्ज्वला वेदपाठक, ह.भ.प. गायत्री देशमुख, ह.भ.प. विकास दिग्रजकर यांचे कीर्तन रंगले. ह.भ.प. मृणाल जोशी, ह.भ.प. मंदार गोखले, ह.भ.प. कृष्णा मालकर, ह.भ.प. प्रा. संगीता मावळे यांच्या कीर्तनाने वारकरी मंत्रमुग्ध झाले.