Thu, May 23, 2019 14:39
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › इंजिनिअरिंगची प्रश्‍नपत्रिका ‘व्हायरल’

इंजिनिअरिंगची प्रश्‍नपत्रिका ‘व्हायरल’

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 24 2018 12:20AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षाचा मॅकेनिक्स विषयाचा पेपर सुरू झाल्यावर काही वेळातच  सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयातून पेपर फुटला आहे, अशी माहिती काहींनी विद्यापीठ प्रशासनाला दिली; मात्र, पेपर फुटला नसून, कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 

अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा पेपर सकाळी दहा ते बारा यावेळेत होता. काही क्‍लासचालकांनी पेपर फुटल्याबाबत परीक्षा विभागाकडे तीन पेपर पाठविले. त्याची तपासणी केल्यावर दोन पेपर गेल्या काही वर्षातील होते, तर एक पेपर बुधवारचाच होता. याबाबत चौकशी केल्यानंतर तो पेपर सुरु झाल्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर कोणीतही सोशल मीडियावरुन व्हायरल केला असल्याचा दावा विद्यापीठाने केला.  

कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयास विद्यापीठाकडून सकाळी 9.40 ला हा पेपर पाठविण्यात आला होता. साडेदहाच्या सुमारास तो व्हायरल झाला. याबाबत माहिती मिळल्यावर  पथक पाठवून त्वरित चौकशी सुरु केली, तेव्हा हा पेपर फुटला नसून, परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणीतही पेपर व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

एमआयटीचा संबंध नाही 

सोशल मीडियावर पेपर व्हायरल झालेल्या प्रकरणाशी संस्थेचा काहीही संबंध नाही. विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षा घेतली जात असून नियमांनुसार विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने पेपर देऊन बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याकडून तो व्हायरल केला गेला असू शकतो, असे संस्थेद्वारे सांगण्यात आले.

...अन्यथा तक्रार व कारवाई

परीक्षा सुरू झाल्यावर पेपर व्हायरल झाल्यामुळे तो फुटला असे म्हणता येणार नाही. अफवा पसरविणार्‍यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

पेपर व्हायरल की फुटला?

पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर उत्तरपत्रिका जमा करून संबंधित विद्यार्थी प्रश्‍नपत्रिकेसह केंद्राबाहेर येऊ शकतो. त्यानंतर त्याने प्रश्‍नपत्रिका व्हायरल केली असल्यास त्याला ‘पेपर फुटला’ असे म्हणता येणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, पेपर सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्राच्या आतून हा पेपर व्हायरल झाला की बाहेरून, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. एखाद्या केंद्रामध्ये विद्यार्थ्याने परीक्षा खोलीत मोबाईल नेऊन हा प्रकार केला असल्याचीही शक्यता आहे. याबाबत डॉ. चव्हाण यांना विचारले असता चौकशी सुरू असून त्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.