Tue, Feb 19, 2019 14:51होमपेज › Pune › बुलेटसाठी इंजिनिअरकडून पत्नीचा छळ

बुलेटसाठी इंजिनिअरकडून पत्नीचा छळ

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी

एका आयटी इंजिनिअर पतीने केवळ बुलेट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी पत्नीचा छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वानवडीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी आयटी इंजिनिअर पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून विक्रम सर्जेराव गाडे (वय 35, रा. मंहमदवाडी) व इतर पाच जणांवर कौटुंबिक छळ, फसवणूक या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे नुकतेच लग्न झाले आहे. आरोपी हा मुंबई येथे आयटी कंपनीत नोकरीस आहे. गाडे वानवडीत कुटुंबासह राहतो. आठवड्यातून दोन दिवस तो घरी येतो.

त्याला बुलेट घ्यायची होती. त्याला मोठा पगार आहे. तरीही त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारदार यांना बुलेटसाठी माहेरून पैसे घेऊन येण्यास सांगितले. पण, तक्रारदार यांनी माहेरून पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच, मारहाण केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, आरोपीने तक्रारदार यांच्याशी विवाह करताना खोटी माहिती दिली. 

आरोपीने वय कमी असल्याचे सांगितले. तर, आजार असल्याचेही लपवून ठेवले. विवाहानंतर या आजाराची माहिती समजली. याबाबत विचारल्यानंतर आरोपींनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करत आहेत.