Fri, Aug 23, 2019 21:14होमपेज › Pune › पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे शहर काँग्रेसला ऊर्जा

पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे शहर काँग्रेसला ऊर्जा

Published On: Aug 04 2018 1:35AM | Last Updated: Aug 04 2018 12:30AMपिंपरी : मिलिंद कांबळे

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलिंगन देऊन काँग्रेस पक्ष देशातील प्रत्येक नागरिकाशी द्वेषाने नव्हे तर, सर्वांना प्रेमाची वागणूक देत आहे. प्रेमाने  काम करणारा पक्ष असल्याचा संदेश दिला. ही बाब प्रसार माध्यमासह सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आली. स्थानिक पातळीवर मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आला. कार्यकर्तेही मागे राहिले नाहीत. या क्लिपला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढून, एकप्रकारचे बळ मिळाले आहे. ही बाब येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत ऊर्जा म्हणून उपयोगी ठरणार असल्याचा विश्‍वास स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.  

पक्षश्रेष्ठींवर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडे लक्ष देत नसून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडले आहे, अशी नाराजी व्यक्त करीत शहराध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे सादर केले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी नाराजांची समजूत काढली आणि लगोलग राजीनामेही मागे घेतले गेले. हे नाट्य गेल्या महिन्यात घडले. 

मुळात सध्या पक्षात उत्साह कमी आहे. जसजसा लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येतील, तसतसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात त्या ठिकाणच्या समविचारी पक्षासोबत आघाडी करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे, असा निर्णय नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत घेण्यात आल्याचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी सांगितले. त्याचा थेट कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास प्राधान्य देणार आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात मावळ लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तसेच, पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीनही विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. नव्या आघाडीच्या सुत्रात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात ‘हल्लाबोल आंदोलन’ यशस्वी करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यापद्धतीने आक्रमक भूमिका अद्यापही काँग्रेसकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अवस्था काहीशी मरगळलेली आहे. कार्यकर्त्यांना सध्या प्रोत्साहनाची गरज आहे.

अविश्‍वास ठरावाच्या वेळी संसदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतली. काँग्रेस द्वेषाने नव्हे तर, महात्मा गांधीच्या विचाराप्रमाणे प्रेमाने काम करीत आहेत. त्या दृष्टीने देशभरात झटत आहे, असा संदेश गांधी यांनी दिला. यांची ही ‘जादूची झप्पी’ची क्लिप शहर कार्यकर्त्यांनी संदेश सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आली. त्यासाठी खास मीडिया सेल कार्यरत करण्यात आला. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना मोठे बळ  दिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत उत्साह कायम ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे हे पाठबळ खूपच उपयुक्त ठरणार आहे, असे  शहर कार्यकर्त्यांना वाटत आहे.