Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Pune › अतिक्रमण निरीक्षक पडाळ यांची समाजकल्याण विभागात बदली

अतिक्रमण निरीक्षक पडाळ यांची समाजकल्याण विभागात बदली

Published On: May 25 2018 6:25PM | Last Updated: May 25 2018 6:25PMपुणे : प्रतिनिधी

मार्केटयार्ड परिसरात अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षक किशोर पडाळ यांची समाजकल्याण विभागात उपअभियंता पदावर बदली करण्यात आली आहे. पडाळे यांच्यावरून पालिकेत सभागृहनेते आणि कॉग्रेसचे गटनेते यांच्यात वाद रंगला आहे, त्यांची बदली राजकीय दबावापोटी तडकाफडकी करण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरु आहे.

मार्केटयार्ड परिसरात अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून पडाळ यांना पालिका भवनातील कार्यालयात येऊन एकाने मारहाण केली होती. या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काही दिवसांनी पडाळ यांच्या विरोधात मार्केटयार्ड येथील एका हॉटेल मालकाने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. हा मुद्दा पालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला होता. 
अशा प्रकारच्या घटनांमुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत निर्माण होऊन त्यांचे मनोधैर्य खचेल. अधिकार्‍यास मारहाण करणारा व्यक्ती राजकीय पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला होता. 

मारहाण झालेल्या कर्मचार्‍याने पैशाची मागणी केली होती. याच कारणास्तव चार महिन्यांपुर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असे सभागृह नेते भिमाले यांनी यावेळी सांगितले. त्यावरून शिंदे आणि भिमाले यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. या गोंधळा नंतर भिमाले आणि शिंदे यांनी एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केले होते. महापालिकेच्या इतिहासात सर्वसाधारण सभेतील विधानावरुन सभागृहनेते आणि एका पक्षाच्या गटनेता यांनी परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे. 

या सर्व प्रकारानंतर पडाळ यांची तडकाफडकी अतिक्रमण विभागातून समाजकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. पडाळ यांची बदली राजकीय दबावापोटीच करण्यात आल्याची चर्चा अतिक्रमण विभागात सुरू आहे.