Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Pune › वाकडमधील आरक्षित जमिनींवर अतिक्रमण

वाकडमधील आरक्षित जमिनींवर अतिक्रमण

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 20 2018 10:52PMवाकड : वार्ताहर 

शहरातील आरक्षित जागा ताब्यात घेण्यास प्रशासन उदासीन असल्यामुळे या आरक्षित जागेवरील अतिक्रमणांचे प्रमाण वाढत आहे. वाकड, पिंपळे निलख येथील एकूण आरक्षणाच्या केवळ वीस टक्के जागा ताब्यात असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

वाकड, पिंपळे निलख हा झपाट्याने विकसित होत असलेला परिसर आहे.  वाकडमध्ये एकूण 53 ठिकाणी आरक्षणे आहेत. यामध्ये वाहनतळ, पर्यटन केंद्र, टाऊन हॉल, माध्यमिक शाळा, दवाखाना, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, खेळाचे मैदान, बस डेपो, मैला शुद्धीकरण प्रकल्प, उद्यान, अग्निशामक केंद्र, व्यापारी केंद्र, जकात नाका, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे, सांस्कृतिक केंद्र, दुकान केंद्र, टेलिफोन सेंटर, झोपडपट्टी पुनर्वसन आदी आरक्षणे आहेत. एकूण 34.430 हेक्टर इतका मोठा भूखंड आरक्षित आहे; परंतु त्यातील फक्त 6.170 हेक्टर इतकेच क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आहे. तब्बल 28.260 हेक्टर जमीन अजून ताब्यात घेणे बाकी आहे. 

पिंपळे निलख येथेदेखील एकूण 14 ठिकाणी आरक्षणे आहेत. यामध्ये उद्यान, दुकान केंद्र, बस टर्मिनस, नाट्यगृह, व्यापारी संकुल, बस डेपो, सामुदायिक केंद्र, खेळांचे मैदान, शाळा, स्मशानभूमी, भाजी मंडई, दुकान केंद्र अशी आरक्षणे आहेत. पिंपळे निलखमध्ये एकूण 15.360 हेक्टर जमिनीवर आरक्षण आहे. त्यातील 9.160 हेक्टर इतक्या जमिनीवर महापालिकेचा ताबा आहे. 

उर्वरित 6.200 हेक्टर जमीन अद्याप ताब्यात घेतली गेली नाही. वाकड, पिंपळे निलखमधील या  आरक्षित जागेवर अतिक्रमण होण्याचे  प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या आरक्षित जमिनीवर अतिक्रमण झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.