होमपेज › Pune › आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण

आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:08AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

आकुर्डी रेल्वे स्टेशनकडून प्राधिकरणात जाणार्‍या वाहनांनी आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर व्यापला आहे. येथील अतिक्रमणांमुळे चालायचे कसे असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील पदार्थ खाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागीच नागरिक उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा येत  आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशन नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते; मात्र रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पीएमपी बसला येथून जाताना मोठी कसरत करावी लागते. रिक्षाचालक प्रवासी मिळवण्यासाठी स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांना त्याचा त्रास होतो; मात्र, रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे त्यांना कोणी काही बोलत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्राधिकरण पोलिस चौकीकडे जाणार्‍या रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे रस्त्याचा अर्धा भाग या गाड्यावाल्यांनी गिळकृंत केला आहे. या गाड्यांवरील पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने पाणी रस्त्यावर येत आहे.

या रस्त्यावर नामांकित खाद्यपदार्थांचीही दालने झाली आहेत; मात्र त्यांनी पार्किंगची पुरेशी व्यवस्था न केल्याने नागरिक बेशिस्तपणे रस्त्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वाहने उभी करत आहेत. याकडे येथील वाहतूक पोलिस डोळेझाक करत असून, त्यांच्यावर  कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाहीत. 

स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण विभागाला वारंवार निवेदने देऊनही खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर   पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली नाही. 

रेल्वेस्टेशनजवळच अनेक शैक्षणिक संस्था असल्याने येथून विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा  सुरू असते. विद्यार्थी बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करून वाहतूक कोंडीमध्ये भर टाकतात. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्तबद्ध करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

शेजारीच ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे या गाड्या जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत आहे. या रस्त्यावर पुढे पोस्ट ऑफिस, प्राप्तिकर कार्यालय असल्याने नागरिकांची मोठी रहदारी असते, तरीदेखील वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभाग शांत का आहे, असा प्रश्‍न येथील नागरिक करत आहेत.