पुणे : प्रतिनिधी
वन विभागाच्या महंमदवाडी येथील जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरला वनविभागाने ‘सील’ ठोकले आहे. याबाबतची पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन अधिकार्यांनी दिली आहे. या टॉवरचे महिना एक लाख रुपयाचे भाडेही तिसराच व्यक्ती घेत असल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळे या अनाधिकृत मोबाईल टॉवरला ‘सील’ ठोकले असून महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या समोर वन विभागाची जागा आहे. या जागेवर टोलेजंग मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहे. या टॉवरसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी वन विभागाच्या वतीने देण्यात आलेली नाही. तसेच त्याबाबतची माहितीही वन विभागाला संबंधितांनी दिलेली नाही. दरम्यानच्या काळात ही जमीन वन विभागाची नसून स्वतःची असल्याचा दावा या ठिकाणी असलेल्या एका स्थानिक व्यक्तीने केलेला आहे. त्यामुळे हा व्यक्ती हा दर महिन्याला लाखो रुपयांचे भाडेही घेतो. या व्यक्तीचे म्हणणे असले तरी ही जागा वन विभागाचीच असल्याची माहिती वन अधिकार्यांनी दिली आहे.
गेल्याच महिन्यामध्ये पाचगाव पर्वती येथील तळजाई टेकडीजवळ असलेल्या वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण वन विभागाच्या अधिकार्यांनी हटविले आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्यांच्या बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढण्यात आले असून 25 ते 30 नागरिकांची कच्च्या व पक्क्या घरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सिंहगडरोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील प्रभाग क्र. 34 मध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई करताना पाच जे.सी.बी. आणि वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या साहाय्याने करण्यात हे अतिक्रमण काढण्यात आले आहे.
याबाबत बोलताना वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, मंहमदवाडी येथे असलेल्या वन विभागाच्या जागेवर टोलेजंग मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता हे टॉवर पाडल्यास तेथील स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या हे मोबाईल टॉवर ‘सील’ करण्यात आलेले असून त्या जागेवर स्थानिक एका व्यक्तीने हक्क दाखविलेला आहे. परंतू ही जागा वन विभागाचीच असून त्याच्या पुढील कार्यवाहीबाबत हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.