Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Pune ›

हल्‍लाबोल आंदोलनामुळे राष्ट्रवादीत उत्साह
 

हल्‍लाबोल आंदोलनामुळे राष्ट्रवादीत उत्साह
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:53AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये  आलेले नैराश्य हल्लाबोल आंदोलनामुळे झटकले जाण्याची चिन्हे आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आले की गर्दी करायची, एरवी जनसामान्यांच्या प्रश्नावर होणार्‍या आंदोलनाकडे फारसे फिरकायचे  नाही, या प्रकाराची दखल घेत पवारांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवकांना चांगलेच खडेबोल सुनावल्याने सर्वजण गटबाजी विसरून आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.

राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असून सोमवारपासून कोल्हापुरातून आंदोलनास सुरुवात झाली या आंदोलनंतर्गत दि 10 एप्रिल रोजी गावजत्रा मैदान भोसरी व दि 11 रोजी सायंकाळी 6 वाजता चिंचवड मतदार संघात काळेवाडीतील एम एम शाळेसमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत त्याच्या तयारीसाठी सर्वजण गटतट विसरून एकत्र आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पंधरा वर्ष सत्ता गाजविलेल्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीपासून गळती लागली. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे असे  दिगग्ज  नेते भाजपाला जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाली त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घातल्याने राष्ट्रवादीपुढे प्रथमच मोठे आव्हान निर्माण झाले या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्तेत असताना केलेल्या विकास कामांवरच मते मागितली तर विकास कामांच्या नावाखाली राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने प्रचार सभांमधून केला. या निवडणुकीत जनतेने 128 पैकी 77 जागा भाजपच्या पारड्यात टाकून त्यांच्या हाती  निर्विवाद सत्ता दिली राष्ट्रवादीला 36 जागांवर विजय मिळवता आला .विरोधी पक्षनेतेपदी योगेश बहल यांची वर्णी लागल्याने नाराज झालेल्या ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी बंडाची भाषा केली  समर्थक नगरसेवकांसह राजीनाम्याचा इशारा दिला. पुढे हे वादळ शांत झाले.

पालिकेत सत्तेत असताना प्रचंड विकासकामे करूनही पालिका निवडणुकीत जनतेने  विरोधात कौल दिल्याने राष्ट्रवादीत  नैराश्य निर्माण झाले पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहराकडे पाठ फिरवली फार क्वचितच ते शहरवासीयांना दिसले नैराश्य झटकून अजित पवार यांनी दि.29 सप्टेंबरला शहराचा दौरा केला पालिका प्रशासनाची झाडाझडती घेतली शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना भूमिपूजन झालेल्या विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतली पत्रकार परिषद घेऊन  भाजपवर तोफ डागली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मंडळींचा समाचार घेतला त्यामुळे पक्षात काहीसे चैतन्य निर्माण झाले मात्र अजित पवार आले तरच तोंड दाखवायला यायचे अशी पक्षाच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता झाल्याने पक्षाच्यावतीने जनसामान्यांच्या प्रश्नांवर होणार्‍या आंदोलनाकडे ते फिरकतही नाहीत असे चित्र दिसू लागले.

महापालिकेत राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक अथवा त्यांच्या नातेवाईकांचे ठेके असल्याने भाजपला विरोधास ते धजावत नाहीत अशी कुजबुज पालिका वर्तुळात सुरू झाली अजित पवार सत्ता असताना ज्या भाषेत स्थानिक नेते व पदाधिकार्‍यांना ठणकवायचे तसे आता बोलत नाहीत, ती रग त्यांच्यात दिसत नाही हे जाणून स्थानिक नेते सुस्तावले .पालिका निवडणूक होऊन गेल्याने नेत्यांना आंदोलने, पक्षवाढीत रस राहिला नाही. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांचा चहा पाण्याचा खर्च करायला नको म्हणून नगरसेवक आलिशान गाडीतून येऊन एकेकटे आंदोलनात दिसू लागले. प्रतिकूल परिस्थितीत पक्षात प्राण आणण्याचे काम शहराध्यक्ष संजोग वाघेरे  यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आघाडी व युवक राष्ट्रवादीने मात्र नेटाने केले ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलन, गुटख्याची होळी, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधणारी गुढी, कोपर्डी प्रकरण, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या तथाकथित अश्लील वक्तव्याविरोधात आंदोलन, जबाब दो आंदोलन, तहसील कार्यालयावर मोर्चा अशी अनेक आंदोलने करण्यात आली.

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे यांनी सांगवी, पिंपळे गुरव मध्ये डासांचा उपद्रव वाढल्याबद्दल आयुक्तांना डास मारण्याची बॅट भेट देऊन आंदोलन केले त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणारा पक्ष अशी पक्षाची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली. आता लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने सुरू केलेले हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. शहरात दि 10 आणि 11 रोजी पक्षाच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत निवडणूक प्रचाराची ही रंगीत तालीम असल्याने हा फ्लॉप शो ठरू नये यासाठी पवार यांनी पुण्यात बैठक घेऊन खडेबोल सुनवल्याने आता सर्व गट तट कामाला लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.

Tags : Pimpri, Encouragement, NCP, because,  Halla Bol Morcha