Fri, Nov 16, 2018 05:15



होमपेज › Pune › निगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम

निगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:04AM

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे. त्याचा खर्च महापालिका करणार आहे. ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतर येणार्‍या खर्चाचा भार पेलण्यास महापालिका सक्षम आहे, असे सांगत झपाट्याने वाढणार्‍या शहरासाठी भविष्यातील गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.14) स्पष्ट केले. 

शहरात केवळ दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यान पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. शहरातील नागरिक आणि नगरसेवकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत म्हणजे 5.30 किलोमीटर अंतरापर्यंत नेण्याची स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी 24 नोव्हेंबरला आयुक्त हर्डीकर यांच्या माध्यमातून मेट्रोकडे केली होती. त्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दुजोरा दिला होता. 

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या सदर वाढीव सुमारे 600 ते 800 कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने उचलल्यास मेट्रो काम करण्यास तयार असल्याचे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी 2 डिसेंबरला सांगितले होते. त्याच दिवशी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका खर्च उचलण्यास सक्षम असल्याचे सांगत खर्चाची तयारी दर्शविली होती. या संदर्भात ‘पुढारी’ने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यासंदर्भात आयुक्तांना पत्रकारांनी विचारले असता, ते बोलत होते. 

आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ बनविण्यास मेट्रोला सांगितले आहे. त्याचा सुमारे 40 ते 50 लाख खर्च महापालिका मेट्रोस देणार आहे. वाढीव खर्चाची बाब महापालिकेची आर्थिक क्षमता पाहून घेतला जाईल. शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात संधी आहेत. भविष्यातील गुंतवणूक म्हणून ही बाब शहराच्या हिताची आहे. आर्थिक क्षमता पेलण्यास महापालिका सक्षम आहे. मेट्रोकडून ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतर त्यासंदर्भात ठरविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वल्लभनगर येथील स्थानकासाठी महापालिका पाण्याचा टाकीजवळील जागा देण्यास तयार आहे; मात्र त्यांना दुसरीकडील जागा हवी आहे. त्याचबरोबर मेट्रोने एकूण 12 जागांची मागणी महापालिकेकडे केली आहे. शक्य असलेल्या जागा त्वरित मेट्रोला दिल्या जाणार आहेत. उर्वरित जागांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या संदर्भातील गुरुवारी होणारी बैठक रद्द झाली आहे.