Wed, Apr 24, 2019 11:49होमपेज › Pune › ‘एम्पायर इस्टेट’ पुलाकडे नागरिकांची पाठ

‘एम्पायर इस्टेट’ पुलाकडे नागरिकांची पाठ

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 12:57AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम आठ वर्षांनी  मार्गी लागले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, पुलाचे उद्घाटन होऊन आठवडा लोटला तरी पुलावरून वाहनांची वर्दळ दिसत नाही. रॅम्प न झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घेऊन पुणे-मुंबईच्या दिशेने जावे लागत असल्याने पुलाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.  

महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत अकरा किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत 1600 मीटर लांबीच्या चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. लोहमार्ग , महामार्ग ओलांडून जाणार्‍या  या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध  झाल्या. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली.  

गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी  पुलाचे काम पूर्ण झाले.   पालकमंत्री बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण तसेच या पुलाचे ‘संत मदर तेरेसा’ असे नामकरण करण्यात आले.  मात्र सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या  पुलाचे उद्घाटन होऊन आठवडा होऊन गेला तरी अद्याप पुलावर वाहनांची वर्दळ वाढली नाही.  पुलाला  रॅम्प केला गेला नसल्याने वाहनचालकांना वळसा घालून पुणे मुंबई महामार्गावर यावे लागते.  रॅम्पच्या कामास एम्पायर इस्टेटवासियांचा विरोध आहे. तसेच स्मशान भूमीजवळ दोन कंपन्यांकडून जागा ताब्यात न आल्याने बीआरटी पुढेही आजमितीस तरी अडचण आहे. एकूणच पुलाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.