Tue, Mar 19, 2019 11:56होमपेज › Pune › आपत्कालीन नियंत्रण कक्ष शोभेचा!

आपत्कालीन नियंत्रण कक्ष शोभेचा!

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 12:49AMपुणे : पांडुरंग सांडभोर

अतिवृष्टी होऊन मुंबईसारखे पुणे तुंबले तर महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून मदत येईल, अशी अपेक्षा करणार असाल तर सावधान...!  महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष केवळ शोभेचा असल्याचे ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. सफाई न झाल्याने तुंबलेले नाले, कालबाह्य ड्रेनेज व्यवस्था आणि महापालिकेचे केवळ कागदोपत्री नियोजन, अशा स्थितीत पुण्यात अतिवृष्टी झाल्यास शहरात ‘जलसंकट’ निर्माण होऊ शकते.  

दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला जातो. महापालिकेच्या मुख्य इमारतीत हा नियंत्रण कक्ष असून तो चोवीस तास सुरू असतो. त्यासाठी एका आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍याची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र, हा पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कसा नावापुरताच आहे, हे या कक्षाशी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर अनुभवायला येते. 

प्रामुख्याने पावसाळ्यात झाडे पडणे, नागरी वस्तीत पाणी शिरणे, अशा घटना घडल्यानंतर या कक्षाकडून या तक्रारी केवळ संबधित खात्याकडे पाठवण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर या कक्षाची बाकी कोणतीही जबाबदारी नाही, झाड पडले असेल, तर अग्निशमन विभागाला कळविणे. पूरस्थिती निर्माण झाली तर संबधित क्षेत्रिय कार्यालयाला कळविणे, एवढेच काम सद्यःस्थितीला या नियंत्रण कक्षामार्फत सुरू आहे. त्यामुळे हा कक्ष म्हणजे केवळ नामधारी राहिला आहे.

आपत्ती निवारण करणार कोण?

पूर परिस्थिती अथवा दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये नागरिकांना तात्काळ मदतीची अपेक्षा असते. मात्र, त्यासाठी स्वतंत्र अशी कोणतीच यंत्रणा, अथवा स्वत:चा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग महापालिकेकडे नाही. त्यामुळे सगळा भार पालिकेच्या कर्मचारी वर्गावर येतो. पावसाळ्यासाठी तयार झालेल्या कृती आराखड्यांमध्ये शहरातील पूरपरिस्थितीची ठिकाणे, ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मदत करण्यासाठीची संपर्क यंत्रणा, मदतीची ठिकाणे, नद्यांमध्ये किती पाणी सोडल्यानंतर पुराची स्थिती निर्माण होते, अशी सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र या सगळ्यात आपत्ती नियंत्रण कक्ष केवळ समन्वयाची भुमिका पार पडण्याचे काम करीत असून, मदतीसाठी पालिकेच्या यंत्रणेवरच अवलंबून रहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाण्याचा निचरा होणार कसा?

पुण्याची ड्रेनेज व्यवस्था कालबाह्य आहे. मध्यवर्ती भागात जुन्या वाहिन्यांवर नवीन इमारतीतींल सांडपाण्याचा ताण येत आहे. उपनगरातील विस्तारीत भागात तर ड्रेनेज व्यवस्थाच नसल्याने अतिवृष्टी झाल्यास या कालबाह्य वाहिन्यांतून पाणी वाहून जाणार नाही आणि यावेळी पाण्याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र, ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही.  

यापूर्वीच्या अनुभवातून धडा घेतला?

कात्रज येथे अतिवृष्टीनंतर टेकडीवरील पाणी मोठ्या प्रवाहाने महामार्गावर येऊन कार वाहून जाऊन माय-लेकीला जीव गमवावा लागला होता. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तांनाच पूराचा फटका बसला होता. या अनुभवातून धडा घेण्याची गरज होती. मात्र, पुण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये आपत्कालीन परिस्थितीवेळी दोन हात करण्यासाठी वेगळी यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुणेकरांनीच स्वत:ची काळजी घेण्यासाठी उपयोजना करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

अधिकार्‍याची परदेशवारी!

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गणेश सोनुने हे पुर्णवेळ अधिकारी आहे. मात्र, सोनुने हे कक्षाकडे अपवादानेच फिरत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या अधिकार्‍याकडे एक नव्हे तर तब्बल तीन वेगवेगळे पदभार देण्यात आले आहेत. त्यात वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्तपद, वृक्ष अधिकारी अशा महत्वाच्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती कक्षाकडे डोक़ावण्यास त्यांना वेळेत मिळत नाही आणि नागरिकांनी मोबाईलवरून संपर्क साधल्यावरही ते उपलब्ध होत नाही अशी अवस्था आहे. त्यात आता हे अधिकारी परदेश वारीला गेले आहेत. सिंगापुर येथे 10 ते 12 जुलै या कालावधीत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ते गेले आहेत. मात्र, या कालावधीत आपत्ती निर्माण झाल्यास त्यास नियंत्रण कोण करणार असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.