Tue, May 26, 2020 17:18होमपेज › Pune › एल्गार प्रकरण : ..मग प्रकाश आंबेडकरांची चौकशी का नाही ?

एल्गार प्रकरण : ..मग प्रकाश आंबेडकरांची चौकशी का नाही ?

Last Updated: Oct 10 2019 8:32PM
पुणे : प्रतिनिधी 

एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रात टोपण नावे मिळून आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला मात्र काही पत्रात कॉम्रेड प्रकाश आंबेडकर असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र पोलिसांनी त्यांची साधी चौकशी का केली नाही असा प्रश्न बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. रोहन नहार यांनी जामिनाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित केला.

सध्या सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. यावेळी तेलगू कवी वरवरा राव व रोना विल्सन यांच्या वतीने रोहन नहार यांनी बाजू मांडली. 

नहार म्हणाले, तपासादरम्यान पोलिसांनी अनेक कागदपत्रे, पत्रे जप्त केली आहेत. त्यात पाठविणारा आणि ज्याला पाठविले हे अनोळखी आहेत. तपास अधिकार्‍याकडे अटक करण्यात आलेले आणि पत्रात टोपण नाव असणारे हेच आहेत असा दाखविणारा एकही पुरावा पोलिसांकडे नाही. इंडियन असोसिएशन पीपल्स लॉयर्स (आयपीएल) ही सीपीआय (एम) ची फ्रंटल ऑरगनायझेन असल्याचे सांगतात मात्र त्यावर सरकारने बंदी घातलेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शरण आलेल्या माओवाद्यांनी वरवरा राव हे माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले. हे गृहीत धरता येणार नाही. त्यांच्यावर 27 गुन्हे दाखल करण्यात आले मात्र  एकही आरोप सिद्ध करता आला नसल्याचे नहार यांनी सांगितले. एल्गार परिषदेमुळे दुसर्‍या दिवशी दंगल झाल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र त्यांनी याचा एकही पुरावा दिला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रथमदर्शी विल्सन व राव यांच्या विरोधात पुरावा नसल्याचे नहार यांनी न्यायालयास सांगितले.

शोमा सेन यांची बाजू मांडतांना राहुल देशमुख म्हणाले, सेन यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये काहीही सापडले नाही. पोलिसांना चार पत्र सापडली असून ते कोणी पाठविले आहे याचा उल्लेख नाही. सेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. अत्याचारित स्त्रियांचा आवाज सेन उठवत असतात. यात कुठलेही शस्त्र वापरल्याचा पुरावा नाही हा गुन्हा होऊ शकत नसल्याचे देशमुख म्हणाले. तसेच एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमा येथे दंगल झाली असल्याचे सांगत असताना कोणाचेही म्हणणे नोंदवले नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, व्हेर्नान गोन्सालविस यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.