Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Pune › उद्योगनगरीतील कामगारांचा हक्कासाठी ‘एल्गार’

उद्योगनगरीतील कामगारांचा हक्कासाठी ‘एल्गार’

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:01PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रदीप लोखंडे

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी अशी आहे; मात्र 2017 या वर्षात उद्योगनगरीतील कामगारांनाच आपल्या मागण्यांसाठी ‘एल्गार’ करावा लागला. ‘एचए’ कंपनीतील कामगारांना अनेक महिने पगाराविना राहावे लागले. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी अचानक बंद केल्याने कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. अल्फा लावल कंपनीतील कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकल्याने कामगारांनी कंपनी गेटवर आंदोलन केले, तर सफाई कामगारांना ‘पीएफ’ व इतर हक्काच्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. 

शहरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 2012 पासून कंपनीचे उत्पादनच बंद आहे. काही विभागांतच उत्पादन सुरू होते. शासनाकडून अनुदानाचे  आश्‍वासन दिले होते. केंद्रस्तरावरून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. ही कंपनी सुरळीत चालू राहावी म्हणून शहरातील लोकप्रतिनिधीही योग्य ती खबरदारी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कामगारांना पगारच मिळत नाही. कंपनीला 2012 मध्ये 10 कोटी रुपये दिले होते; मात्र त्यामधून कंपनीची काही कामे झाली असून, बाकीची कामे रखडली आहेत. कंपनीत 1 हजार 75 पैकी केवळ 50 लोकांचाच प्लँट सुरू आहे. त्यामुळे कंपनी सुरू राहायची असेल, तर उत्पादनासाठी निधी देणे गरजेचे असल्याचे कामगार सांगत आहेत.

अल्फा लावल कंपनीने कंत्राटी कामगारांना अचानक नोकरीवरून काढून टाकले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करत कंपनी प्रवेशद्वारासमोरच एक दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले. काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली; मात्र त्याबाबतही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. 

शहरातील कचरावेचक, घंटागाडी चालक आदींना ‘पीएफ’ व इतर सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कागद-काच-पत्रावेचक कष्टकरी पंचायतीच्या वतीने वारंवार महापालिका भवनासमोर आंदोलने करण्यात आली आहेत, तरी कचरावेचकांना ठरलेला पगार दिला जात नाही. सुरक्षेची साधने दिली जात नाही. यंदा ‘पीएफ’ देखील न दिल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

पंडित ऑटोमोटिव्ह कामगारांचे 26 दिवस कंपनीत आंदोलन 

रखडलेला पगार, बंद केलेल्या सुविधा आदींसह विविध मागण्यांसाठी कंपनीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कंपनीतच बसून सुमारे 120 कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 4 डिसेंबरपासून हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत कंपनीतच बसून आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार कामगारांनी केला आहे. 26 दिवस कामगारांनी कंपनीमध्येच बसून आपले आंदोलन चालू ठेवले आहे.

‘एचए’ भूखंडाची होईना विक्री   

कंपनीच्या मालकीची काही जागा विक्री करून; तसेच कर्ज स्वरूपात रक्कम उभी करून कामगारांची थकीत देणी; तसेच खेळत्या भांडवलासाठी सहाशे कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास ही कंपनी पुन्हा सुरू होईल, असे मत अनेकांनी मांडले आहे. खासगी लोकसहभागातून अथवा अन्य मार्गाने सोईस्कर ठरेल, तो पर्याय स्वीकारून कंपनीला नवसंजीवनी दिली जाणार आहे; मात्र याबाबत त्वरित निर्णय घेणे गरजेचे असताना, त्यासाठी विलंब लावला जात आहे. मंत्रिमंडळाकडून मात्र केवळ बैठकाच घेतल्या जात आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे त्वरित जागेची विक्री करून कामगारांचा पगार द्या, अशी मागणी कामगारांतून होत आहे.

सुरक्षा साधने नसल्याने कामगार मृत्युमुखी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचार्‍यांना सुरक्षेची साधने पुरवली जात नाहीत. ठेकेदारही याची जबाबदारी घेत नाहीत. सुरक्षा साधनांशिवाय सफाई कर्मचारी नाल्याची साफसफाई करत आहेत. ही कामे करताना दूषित वायूचा त्रास होऊन अनेक कामगार मृत्युमुखी पडले, तर काही जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या, तरीही याबाबत कोणी गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.