Wed, May 22, 2019 06:15होमपेज › Pune › ‘एल्गार’चे कनेक्शन थेट नक्षलवाद्यांशी !

‘एल्गार’चे कनेक्शन थेट नक्षलवाद्यांशी !

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संबंधितांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आल्याने, पुणे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री नागपूर, मुंबई आणि दिल्लीत छापे टाकून 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांबरोबरच ‘अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट’ (यूएपीए) या कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत. रोना विल्सन, दलित लेखक तसेच रिपब्लिकन दलित पँथरचे सुधीर ढवळे, नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग, प्राध्यापिका शोमा सेन आणि महेश राऊत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या महिन्यातच पोलिसांनी तिघांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. यावेळी काही कागदपत्रे जप्त केली होती. यावरून त्यांचे नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याचे पुरावे आढळून आल्याने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांनी दिली. 

एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेे जमले होते. त्यावेळी दोन गटात मोठा हिंसाचार झाला होता. याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

दरम्यान, या दंगलीपूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी रात्री शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात गुजरातमधील आमदार जिग्‍नेश मेवानी आणि उमर खालिद यांनी प्रक्षोभक भाषणे केली. तसेच, एल्गार परिषदेच्या आयोजनात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यार्ंनी सादर केलेल्या गीतांमुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले होते, असा आरोप तुषार दामगुडे यांनी केला होता. याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, एल्गार परिषदेचे आयोजक हर्षाली पोतदार, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, तसेच जिग्‍नेश मेवानी, उमर खालिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान  बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संंबंधित पुणे, मुंबई तसेच दिल्लीतील काही जण, तसेच कोरेगाव भीमा येथील हिंसाचार भडकावण्यामागे काही नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचा हात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या पथकांनी दीड महिन्यांपूर्वी (दि. 17 एप्रिल) पुण्यासह नागपूर, दिल्ली व मुंबई येथील काही कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले होते. पुण्यात येरवडा, वाकड व पिंपळे गुरव येथे छापे टाकण्यात आले होते. यावेळी काही कागदपत्रे तसेच प्रचारपत्रके जप्त करण्यात आली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांची पाच पथके मंगळवारी नागपूर, दिल्ली, मुंबई येथे रवाना झाली. मुंबईतून सुधीर ढवळे यांना, नक्षलवाद्यांशी संबंधित असणारा रोना विल्सनला दिल्लीत, तर नागपूरमधून अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोना सेन यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना गुरुवारी न्यायालयात पुण्यातील हजर करण्यात येणार आहे.

नक्षलवाद्यांकडून फंडिंग?

एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फंडिंग झाल्याची शक्यता आहे. यातील काही आरोपींना अटक करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.