Sun, May 26, 2019 11:48होमपेज › Pune › धायरीतील गुन्हेगारीविरोधात एल्गार

धायरीतील गुन्हेगारीविरोधात एल्गार

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी

टपर्‍या-टपर्‍यांवर मिळारा गांजा अन टवाळ खोर मुलांचा उन्माद त्यातून गुन्हेगारीच्या वाढलेल्या आलेखाला आवार घालण्यासाठी धायरीतील गावकर्‍यांनी गुन्हेगारीविरोधात एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी यांसंदर्भात गावकर्‍यांनी बैठक घेऊन गावात शांतता प्रस्थापित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, याबाबतचे निवदेन सिंहगड पोलिसांना देण्यात आले आहे. 

धायरी परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ गंभीर घटना घडल्या आहेत. त्यातच, रविवारी मध्यरात्री एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले. अस्वस्थ झालेल्या गावकर्‍यांनी सर्व मतभेद, पक्षभेद बाजूला ठेवून गावातील गुन्हेगारीविरोधात एकमताने लढा पुकारण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सर्व गावकर्‍यांनी याबाबत बैठक घेतली. यावेळी तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, राजकाकीय व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

परिसरातील टपर्‍यांवर गांजा विकला जात असून, लहान मुले व्यसनांना बळी पडत आहेत. स्थानिक तरुणांच्या मदतीने बाहेरचे गुंड गावात दहशत निर्माण करीत आहेत. शाळांच्या बाहेर टोळक्यांकडून मुलींची, महिलांची छेड काढली जात आहे. महिलांच्या मदतीला कोणीही येत नाही, तर, दुसरीकडे धायरीगावही बदनाम होत आहे, अशी खंत यावेळी काही महिलांनी व्यक्त केली. 

मुलांच्या चुकांवर पांघरूण घालू नका. त्याचे परिणाम नंतर दिसू लागतात. तसेच, आपली मुले कुठे जातात, काय करतात हे माहित असणे गरजेचे आहे, असा सल्ला यावेळी ज्येष्ठांनी दिला. गावचा संबंध नसणार्‍यांचे वाढदिवस गावात साजरे केले जातात. त्यांचे फ्लेक्स लावले जातात. त्यातून गुन्हेगारीला चालना मिळते. त्यामुळे गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरणारी फ्लेक्सबाजी बंद करावी. गावात पोलिसांची पेट्रोलिंग नाही. त्याचा फायदा घेऊन काही अपप्रवृत्ती गावातील स्वास्थ्य बिघडवत आहेत. पोलिसांवरही नागरिकांनी नाराजी व्यक्क्त केली. त्यानंतर गावकर्‍यांनी बैठकीतील मुद्यांचे निवदेन सिंहगड पोलिसांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आलेले उपनिरीक्षक धुळाजी कोळपे यांना दिले.