Wed, Jul 17, 2019 18:30होमपेज › Pune › अकरावी प्रवेशाचे ऑडिट झालेच नाही

अकरावी प्रवेशाचे ऑडिट झालेच नाही

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी 

इयत्ता अकरावीची यंदाची प्रवेश प्रक्रिया काही दिवसांमध्ये सुरू होईल. परंतु मागील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. कारण या प्रवेश प्रक्रियेचा ऑडीट अहवालच शासनाकडे नसल्याचे माहहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश समितीकडून नागरिकांची, पालकांची दिशाभूल केली जात आहे का, असा प्रश्‍न सध्या निर्माण होतो आहे.

अकरावी प्रवेश हे राज्यपातळीवर महापालिका असणार्‍या ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात येत आहेत. अकरावी प्रवेशातील यापूर्वी होणारे आर्थिक गैरव्यवहार सर्वांनाच परिचित आहेत. म्हणूनच अकरावी प्रवेशाचे ऑडिट केले जावे, असे शासन निर्णयातच नमूद आहे. मात्र पुणे विभागाकडून अद्याप हे ऑडिटच पूर्ण केलेे नसल्याची माहिती सिस्कॉम संघटनेच्या संचालिका वैशाली बाफना यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जात उघड झाल्याचे दिसून येत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असली तरीही त्यात अनेक त्रुटी किंवा छुप्या पध्दतीने प्रवेश देण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. म्हणूनच समितीकडून प्रवेश झाल्यानंतर त्याचे ऑडिट करण्यात येते. मात्र सिस्कॉम या शिक्षणविषयक संघटनेकडून माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावरुन अकरावीचा ऑडिट रिपोर्टच अद्याप समितीने दिला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दिली आहे.

याबाबत सिस्कॉमच्या संचालिका वैशाली बाफना यांनी सांगितले की, उपसंचालक कार्यालयाला 29 जानेवारी रोजी माहिती अधिकारात अकरावीचा शैक्षणिक वर्ष 2017-18 चा ऑडिट रिपोर्ट मिळावा अशी विनंती केली होती. मात्र यावर समितीने 8 फेब्रुवारी रोजी पत्र लिहून कळविले की, अद्याप समितीकडून अद्याप अहवाल शासनाला सादर केलेला नाही, असे उत्तर देण्यात आले. यापुर्वीही माध्यमांमध्ये माहिती देत अकरावीच्या प्रवेशाची तपासणी करणार असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात एकाही महाविद्यालयात अशी कोणतीही तपासणी समितीने केली नाही. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही की ऑडिटच केले नाही, अशी शंका आता उपस्थित होत आहे. दरम्यान या एकूणच प्रकाराबाबत माध्यमिकचे उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ऑडीटर उपलब्ध न झाल्यामुळे ऑडीट केले नसल्याचे सांगत हा विषय राज्यस्तरावरून हाताळला जात असल्याचे सांगितले आहे.

 

Tags : pune, pune news, Eleventh entrance, audit,