Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Pune › अकरा लाखांची लाच घेणारा वनपाल अटक

अकरा लाखांची लाच घेणारा वनपाल अटक

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 12:53AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटला बांधकामाची परवानगी देण्यासाठी आणि जप्त केलेले जेसीबी, इतर वाहने सोडण्यासाठी तब्बल 11 लाखांची लाच घेणार्‍या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे. विलास बाबाजी निकम (वय 49, रा. स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी, सुरक्षानगर, हडपसर) असे अटक केलेल्या वनपालाचे नाव आहे. यासंदर्भात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अधिकार्‍याने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.  

लोणावळा येथे सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. येथे गट नंबर 316 वर खासगी वन अशी सातबार्‍यावर नोंद लागलेली आहे. त्या जमिनीबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत इन्स्टिट्यूटटने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जमिनीमध्ये चर खोदून बांधकाम सुरू केल्याने वन विभागाने इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आणि इतरांवर गुन्हा दाखल केला होता; तसेच घटनास्थळी असलेले जेसीबी, इतर वाहने जप्त करून बांधकाम बंद केले होते. ही जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी आणि पुन्हा बांधकामास परवानगी देण्यासाठी, अडथळा न आणण्यासाठी वनपाल विलास निकम याने इन्स्टिट्यूटच्या अधिकार्‍याला 11 लाखांची लाच मागितली होती.

परंतु, चुकीच्या कामाबद्दल लाच देणे पसंत नसल्याने इन्स्टिट्यूटच्या अधिकार्‍यांनी थेट एसीबीत तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. निकमला लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे बोलविण्यात आले. त्याच्यावर दबा धरून बसलेल्या अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर तक्रारदारांनी योग्य ती जबाबदारी पाळल्याने निकमला 11 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी त्याच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक दत्तात्रय भापकर करीत आहेत.