Mon, Mar 25, 2019 17:35होमपेज › Pune › ग्राहकांना ४८ तासांमध्ये मिळणार विजेचे बिल

ग्राहकांना ४८ तासांमध्ये मिळणार विजेचे बिल

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:21AMपुणे: प्रतिनिधी

राज्यातील वीज ग्राहकांना वेळेत अचूक वीजबिल मिळावे म्हणून महावितरण कंपनीने विजबिलाच्या छपाई आणि त्याच्या वितरणासाठी केंद्रीय स्तरावरील प्रक्रिया शनिवारपासून सुरू केली आहे. नव्या प्रक्रियेमध्ये महावितरणच्या मुख्यालयातील सर्व्हरवर बील तयार करण्यात येणार असून ते परिमंडळ स्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या एजन्सीकडे चोवीस तासांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर एजन्सीकडून हे वीजबिल शहरात 48 तासांमध्ये तर ग्रामीण भागात 72 तासांत वितरित करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये अडीच कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. महावितरण वीज कंपनीच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलाची छपाई आणि ते ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत होता. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्यांना सवलत मिळण्यास अडचण येत होती. तसेच वेगवेगळ्या एजन्सीकडून वीजबिलांची छपाई आणि वितरण होत असल्याने या प्रक्रिया संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.

या मुळे महावितरण कंपनीने प्रक्रिया पद्धतीने वीजबिलाची छपाई आणि वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मोबाईल मीटर रिडिंग अ‍ॅपमुळे प्रत्यक्षवेळी मीटररिडिंग तसेच चेकरिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेत बिलावरची प्रक्रिया जलदगतीने होऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळेल. याशिवाय वीजबिल भरणा केंद्रातील रांगा कमी होतील, असा विश्वास महावितरणला आहे. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबिल न देणार्‍या एजन्सींना दंड आकारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.