Sun, Feb 17, 2019 14:10होमपेज › Pune › पवार-लांडगे दिलजमाई!

पवार-लांडगे दिलजमाई!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : संजय शिंदे

पुणे-नाशिक महामार्गाच्या 90 मीटर रस्तारुंदीकरणाच्या कामाचा पाठपुरावा खा. शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला नसून, तो आ. महेश लांडगे यांनी केला आहे. हे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी आ. लांडगे शासनदरबारी प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती खुद्द महापालिका पक्षनेते एकनाथ पवार यांनी वृत्तपत्रांना दिली. यावरून एकाच मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांमध्ये भविष्याचा वेध घेऊन दिलजमाई होताना दिसत आहे. ही दिलजमाई हृदयातून आहे की वरिष्ठांच्या आदेशावरून, हे मात्र गुपितच आहे. 

शुक्रवारी (दि.24) ला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते, त्या वेळी रस्तारुंदीकरणाच्या कामाबाबत आ. लांडगे यांनी गडकरी यांना निवेदन दिले.  त्या अनुषंगाने एकनाथ पवारांनी याची माहिती देताना कौतुक केले. 

कामाच्या जोरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आ. लांडगे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम भोसरी मतदारसंघात घेऊन राजकीय परिपक्वता सिद्ध केली. त्या दरम्यान आ. लांडगे यांनी पुणे जिल्ह्यात भाजप वाढविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली, त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळणार, असे वातावरण निर्माण झाले आहे. आ. लांडगे यांचा राजकीय दबदबा आणि कामाची पद्धत यामुळे  शिरूर लोकसभा मतदारसंघातही त्यांनी पाळेमुळे मजबूत केली आहेत.

लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ पाहता त्यांचा वाढत असलेल्या लोकसंग्रहामुळे पक्षाकडून त्यांना लोकसभेसाठीही मैदानात उतरविण्यात येऊ शकते, अशी चर्चा शहराच्या राजकारणात आहे. एकनाथ पवार यांनी ही वाद न करताना आ. लांडगे यांच्याबरोबर जुळवून घेतल्याचे चित्र आहे. भविष्यात लोकसभा निवडणुकीला पक्षाने महेश लांडगे यांना उमेदवारी दिली, तर विधानसभा निवडणुकीला आपला विचार होऊ शकतो, या शक्यतेमुळे म्हणा किंवा पक्षात लांडगे यांचा वाढत असलेला दबदबा पाहता त्यांच्या विरोधात उघडउघड जाणे आपल्याला परवडणारे नाही, यामुळे पक्षनेते एकनाथ पवार यांना आ. लांडगे यांच्या विकासकामांच्या पाठपुराव्याबाबत कौतुक  असल्यामुळे आ. महेश लांडगे आणि पक्षनेते एकनाथ पवार यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.