Wed, Aug 21, 2019 02:19होमपेज › Pune › ऐंशी टक्के दिव्यांग निधी पडून

ऐंशी टक्के दिव्यांग निधी पडून

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:13AM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजना राबविण्यात येते. त्यासाठी महापालिका दर वर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपये निधीची तरतूद करते; मात्र त्यातून दिव्यांगांवर होणारा प्रत्यक्ष खर्च खूपच अल्प असून, सरासरी दर वर्षी 80 टक्क्यांपेक्षा अधिक निधी पडून असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिका प्रशासनाच्या या वृत्तीतून दिव्यांगांची कुचेष्टा केली जात असल्याची भावना वाढीस लागली आहे. 

महापालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी केलेल्या निधीची गेल्या दहा वर्षांच्या   तरतुदीपैकी झालेला खर्च पाहिल्यास ही बाब पुढे आली आहे; मात्र या योजनेवर खर्च करण्यास महापालिका प्रशासन उदासीन आहे. महापालिका दर वर्षी दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पात 3 टक्के निधी राखीव ठेवते. गेल्या दहा वर्षांत तरतूद निधी 2 कोटींवरून वाढत जाऊन ती 16 कोटी 65 लाखांपर्यंत गेला आहे. दहा वर्षांतील हा एकूण निधी 71 कोटी 64 लाख 95 हजार आहे. त्यांपैकी केवळ 21 कोटी 2 लाख 56 रुपये इतकाच खर्च झाला आहे. तब्बल 50 कोटी 62 लाख 42 हजार 944 रुपयांचा निधी पडून आहे. 

देश व राज्यात स्वच्छ अभियान वेगात सुरू असताना दिव्यांगांसाठी शौचालयासाठी महापालिकेने 2016-17 मध्ये 4 लाख 46 हजार 724 इतका खर्च वगळता इतर 9 वर्षांत एक पैसाही खर्च केलेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारे विविध उपक्रमांवर काही वर्षांत एकही पैसा खर्च झालेला नाही. केला असल्यास तो खूपच अल्प आहे. या संदर्भात महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले की, दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजनेचा संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दिव्यांग कल्याणकारी केंद्राच्या इमारतीसाठी साडेआठ कोटी खर्चास आणि दिव्यांगांना दर महिन्यास अडीच हजार रुपये पेन्शन देण्यास मान्यता दिली आहे. इमारत उभारणीसाठी शहर अभियंता विभाग कार्य करीत आहेत, तर पेन्शनचे अर्ज छपाई सुरू आहेत. 

महापालिकेची तरतूद व खर्च निधी या क्रमाने
सन 2009-10: 2 कोटी-4 लाख 98 हजार 900. सन 2010-11: 2 कोटी 20 लाख-13 लाख 16 हजार. सन 2011-12: 4 कोटी 20 लाख-40 लाख 43 हजार 675. सन 2012-13: 4 कोटी-1 कोटी 78 लाख 51 हजार 255. सन 2013-14: 3 कोटी 53 लाख 30 हजार -2 कोटी 32 लाख 45 हजार 659. सन 2014-15: 12 कोटी 80 लाख 50 हजार -3 कोटी 26 लाख 53 हजार 143. सन 2015-16: 13 कोटी 30 लाख 25 हजार- 5 कोटी 49 लाख 11 हजार 116. सन 2016-17: 12 कोटी 96 लाख-7 कोटी 22 लाख 92 हजार 639. सन 2017-18 (31 डिसेंबर 2018पर्यंत) : 16 कोटी 65 लाख -34 लाख 39 हजार 669. दहा वर्षांतील एकूण तरतूद निधी 71 कोटी 64 लाख 95 हजार, एकूण खर्च 21 कोटी 2 लाख 52 हजार 56. शिल्लक निधी 50 कोटी 62 लाख 42 हजार 944.

या संदर्भात पालिकेचा निधी
महापालिकेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, त्यासाठी चलन-वलनाची साधने, त्यांच्यासाठी विशेष शौचालयाची व्यवस्था, संगणक प्रशिक्षण, व्यवसायासाठी अर्थसाह्य, मतिमंद व्यक्तींना सांभाळ करणार्‍या व्यक्तींना अर्थसाह्य, बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य, पीएमपीचा मोफत बसपास, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इतर योजना व कार्यक्रम आदीसाठी महापालिका खर्च करते.  महापालिकेच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याचे अधिकारी व पदाधिकारी नेहमी सांगत असतात; मात्र प्रत्यक्षात त्यासाठी खर्च न करता कोट्यवधीचा निधी पडून आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व भोंगळ कारभारामुळे हे घडत आहे. या संदर्भात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, असे सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.