Sun, May 19, 2019 22:07होमपेज › Pune › देहूत कृषी यांत्रिकीकरणाचे आठ लाभार्थी

देहूत कृषी यांत्रिकीकरणाचे आठ लाभार्थी

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:25PM

बुकमार्क करा

देहूरोड :  वार्ताहर 

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ’उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ 2017-18 मोहिमे अंतर्गत शेतकर्‍यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना चालू केली आहे.  या योजनेचा उद्देश राज्यातील घटत असलेली जमीनधारणा, शेती कामासाठी मजुरांची घटलेली संख्या व वाढते मजुरीचे दर या पार्श्‍वभूमीवर स्थानिक परिस्थितीनुरूप  कृषी यांत्रिकीकरणास चालना देणे हा आहे. या योजने अंर्तगत हवेली तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी हवेली, हडपसर, वाघोली, मोशी यांच्या कार्यक्षेत्रामधील गावातील शेतकर्‍यांनी या योजनेस प्रतिसाद देऊन लाभ घेतला आहे. 

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, भातमळणी यंत्र, भातलावणी यंत्र, रिपर, बियाणे व खत पेरणीयंत्र, कल्टीवेटर आदी यंत्र/औजारे अनुदानावर दिली जातात. देहू येथे आठ शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  या योजने अंतर्गत शेतकर्‍यांकडून योजनेत सहभाग असल्याचे फॉर्म भरून घेऊन त्याची सोडत उपविभागीय कृषि अधिकारी ,पुणे यांच्या उपस्थितीत व शेतकर्‍याच्या समवेत काढली जाते.

सोडतीनुसार यादी तयार झाल्यानंतर प्रथम कागदपत्रे सादर करण्यासाठी व कागदपत्रे सादर केल्यानंतर यंत्र खरेदीसाठी तालुका कृषी अधिकारी, हवेली  यांच्याकडून खरेदीची पत्रे दिली जातात व शेतकर्‍याने यंत्र/औजार खरेदी केल्यावर त्याची मोक तपासणी मंडळ कृषी अधिकारी करतात. त्यानंतर  मोक तपासणीचा फोटो, औजाराचे बिल, आधारकार्ड, बँक पासबुक, डिलिव्हरी चलन इ. कागदपत्रे व मोका तपासणी अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी पुणे यांच्या कार्यालयात सादर केल्यानंतर शेतकर्‍यांना बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येते, असे हवेली तालुका  कृषी अधिकारी प्रवीण कदम यांनी सांगितले.