Mon, May 27, 2019 07:40होमपेज › Pune › शहरात रमजान ईद उत्साहात

शहरात रमजान ईद उत्साहात

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:48AMपिंपरी : प्रतिनिधी

‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत उद्योगनगरीत मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध भागात रमजान ईद उत्साहात साजरी केली. यावेळी चिंचवड गावातील ईदगाह मैदानावर शनिवारी मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण केले. तसेच, विश्‍वशांतीची प्रार्थना करत एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

देशाच्या सीमा रेषेवर रक्षण करणार्‍या आपल्या जवानांसाठी निगडी येथील नुरानी मजीद येथेे मौलाना मोहम्मद साहील सलाम यांच्यावतीने तर चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मस्जिद मध्ये मौलान फैज अहमद फैज यांनी देशात एकोपा, बंधूभाव, भाईचारा व शांतता नांदावी यासाठी रमजान ईदनिमित्त विशेष प्रार्थना केली.

मागील महिनाभर उपवास केल्यानंतर चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद भक्ती भावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी लहान थोरांनी नवीन कपडे परिधान करुन मस्जिद, तसेच ईदगाह मैदान, मदरसा येथे सकाळी साडेआठ ते दहा या काळात नमाज पठण केले.   पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील नमाज पठण झाल्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.  

 चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मशिदीत जेष्ठ नेते आझम पानसरे, भाईजान काझी, माजी नगरसेवक अस्लम शेख यांनी नमाज अदा केली. अन्वर खान, झिशान सय्यद, हबीब शेख आदींनी संयोजन केले. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी शहरातील सर्व मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर मौल्लाना इरसाद हफिज सद्दाम, हमजा यांनी नमाज पढविला. पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन उपवासाच्या महिन्यात जशी शांतता एकोपा ठेवला तोच वारसा पुढे चालू ठेवावा असे अवाहन केले. चिंचवड स्टेशन येथील दवा बझार मधील अजूमन शमा ए दिन येथे मौल्लाना हाफीज मोहसीनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नियाज शिकलगार, ताहीर भालदार, इरफान मुल्ला, जाकीर भाई आदीनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर मस्जीद , फातेमा मस्जीद (ओटा स्कीम), कस्तुरी मार्केट, चिखली रोड येथील शमशुल उलम मस्जिद, आकुर्डी येथील मदीना व अक्सा मस्जीद, नूर ए-ईलाही जमात, चिंचवडगाव, गांधीपेठ येथील आलमगीर शाही मस्जीद, वाल्हेकरवाडी येथील मदरसा-ए-जामीया ट्रस्ट चिंचवडेनगर येथील हुसेनी अरबी मदरसा, लिंकरोड, पत्राशेड काळेवाडी, रहाटणी, सांगवी पिंपळेगुरव, वाकड , कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, मोरवाडी, खराळवाडी, नेहरुनगर, लांडेवाडी, भोसरी, घरकुल (चिखली) येथील मस्जीद व मदरसामध्ये मौलानांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केेले. सकाळपासून प्रत्येक मुस्लिम  बांधवाच्या घरी  शीर खुरमा पिण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळींची  गर्दी झाली होती. ईदनिमित अनेक मुस्लिम बांधवांनी गोर गरीब नागरिकांना जकात फित्राचे वाटप केले.