Tue, May 21, 2019 12:15होमपेज › Pune › अधिवेशनापूर्वी कर्जमाफी रक्कम देण्यासाठी आटापिटा

अधिवेशनापूर्वी कर्जमाफी रक्कम देण्यासाठी आटापिटा

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 1:06AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशनापूर्वी पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर अधिकाधिक कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी मंत्रालय पातळीवरून आता आटापिटा सुरू झालेला आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग, सहकार व बँकांकडील याद्यांची पुढील पडताळणी करून हिरव्या यादीतील पात्र लाभार्थ्यांना रक्कम देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी आता सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे यांना पुण्यातून खास याच कामासाठी मंत्रालयात पाचारण करण्यात आले असून ते सध्या तळ ठोकून असल्याचे बुधवारी सहकार आयुक्तालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या दुसर्‍या टप्प्यात बँकांच्या खात्यावर 8 हजार 610 कोटी रुपये जमा करण्यात आलेले असून, त्यातील रक्कम सर्व माहितींच्या पडताळणीनंतर शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येत आहे. याबाबत सुमारे 12 लाखांहून अधिक शेतकर्‍यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे सहकार आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, किती शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली, याची माहिती अद्यापही सहकार विभागाकडून उपलब्ध होत नाही. त्यामध्ये विशेषतः जिल्हा बँकांकडील कर्जदार शेतकर्‍यांकडून सातत्याने विचारणा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कर्जमाफीमध्ये नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाच्या 25 टक्के इतकी रक्कम प्रोत्साहनपर योजनेतील लाभानुसार जमा होणार आहे. त्याचीही नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून होत असलेली सततची विचारणा आणि त्यांना जिल्हा व तालुकास्तरावर बँकांप्रमाणेच सहकार विभागाकडूनही कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने कुंचबणा सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्या पाश्‍वर्र्भूमीवर होत असलेली कोंडी कधी फुटणार? असा प्रश्‍न उपस्थित  होत आहे.