Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Pune ›

शिक्षण समिती नऊ नगरसेवकांचीच
 

शिक्षण समिती नऊ नगरसेवकांचीच
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:56AMपिंपरी :प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड येत्या 20 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत करण्याचे अखेर निश्‍चित झाले आहे. त्यामध्ये केवळ 9 नगरसेवकांची निवड होणार आहे. समितीवर 9 कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवडीचा निर्णय मागे घेतला जाणार आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांची बोळवण होणार आहे.

पालिकेची शिक्षण समिती जून 2017 ला बरखास्त झाली आहे. त्या ऐवजी शिक्षण समिती स्थापनेची प्रक्रिया तब्बल 10 महिन्यांपासून प्रलंबित आहे. समितीवर 9 सदस्यांसह  शैक्षणिक क्षेत्रातील 3 पदाधिकार्‍यांची सदस्य म्हणून निवड करण्याचा निर्णय सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकसारखे धोरण असावे म्हणून पूर्वीचा निर्णय मागे घेत, 9 नगरसेवकांस 9 शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकार्‍यांची सदस्य म्हणून निवडीचा निर्णय सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय करता येणार नसल्याने तो निर्णय प्रलंबित आहे.  

दुसरीकडे समिती सदस्य होण्यास इच्छुक असलेल्या नगरसेवकांचा समिती स्थापनेबाबत  पदाधिकार्‍यांकडे रेटा वाढला आहे. शिक्षण समिती बरखास्त होऊन 10 महिन्यांचा कालावधी वाया गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध विषय समितीसोबतच शिक्षण समिती सदस्यांची निवड 20 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत करण्याचा निर्णय सत्ताधार्‍यांनी घेतला आहे.आयुक्तांशी चर्चा करून 9 शैक्षणिक पदाधिकार्‍यांचा निर्णय मागे घेत केवळ 9 नगरसेवकांची शिक्षण समिती स्थापनेचा प्रस्ताव सत्ताधार्‍यांकडून आहे. त्यानुसार सोमवार (दि.9) पर्यंत प्रशासनाकडून तसा आदेश पारीत करण्यात येईल. त्यानंतर नगर सचिव विभागामार्फत सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर शिक्षण समितीचे सदस्य निवडीचा प्रस्ताव समाविष्ट केला जाईल. मात्र, नव्या शिक्षण समितीकडे खरेदीचे अधिकार नसणार आहेत. ती खरेदी स्थायी समितीच्या मंजुरीनंतर केली जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील 9 पदाधिकार्‍यांची करण्यात येणारी स्वीकृत सदस्य म्हणून निवड रद्द होणार आहे. सत्ताधार्‍यांना कार्यकर्त्यांची समितीवर वर्णी लावून त्याचे पुनर्वसन करता येणार नाही. परिणामी, तीव्र इच्छुक असलेले कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याची वेळ पालिका व पक्ष पदाधिकार्‍यांवर येणार आहे. 

Tags : Pimpri, Education, Committee, nine, corporators, only