Thu, Apr 25, 2019 07:51होमपेज › Pune › हिरड्याला हमीभाव नसल्याने आर्थिक कोंडी

हिरड्याला हमीभाव नसल्याने आर्थिक कोंडी

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:56AMभीमाशंकर : अशोक शेंगाळे

आदिवासी भागातील शेतीमाल म्हणजे पावसाळी पिके भात, वरई, सावा, खुरासनी व हिवाळ्यातील मोठा हिरडा आणि उन्हाळ्यातील बाळ हिरडा यास हमीभाव, तर आदिवासी शेतकर्‍यांच्या पिकास विमा मिळावा. बाळहिरड्यास यावर्षी केंद्र सरकारने आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत 125 ते 150 रुपये हमीभाव द्यावा, अशी शासनदारी मागणी केली आहे.

हिरडा हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांत राहणार्‍या आदिवासी समाजाचे भात शेतीनंतरचे उन्हाळा व हिवाळ्यातील प्रमुख उत्पन्न स्रोत आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोले, अहमदनगर, राजूर, शेंंडी, मुदखडे, देवगाव, मानेरे, ओतुळ, शिरपुंजे, मवेशी या आदिवासी भागातील गावांच्या परिसरात हिरडा मोठ्या प्रमाणात येतो. या हिरड्याची विक्री करून आदिवासी बांधव वर्षभरातील दैनंदिन व्यवहार करतो.

हिरडा तोडण्यासाठी आदिवासी बांधव मुलाबाळांसह झटत असतात. यात पुरुषांसह स्त्रियाही झाडांवर जाऊन तोडणे, झोडणे, वेचणेचे काम करत आहेत. दिवसभर तीव्र उन्हात हा हिरडा तोडून, झोडूून गोळा करण्याचे काम केले जात आहे.  मात्र सरकार व महामंडळाच्या दुर्लक्षामुळे हिरडा कवडीमोल भावाने विकला जातो.

खासगी व्यापार्‍यांचा सुळसुळाट

बहुतेक ठिकाणी महामंडळाच्या खरेदी केंद्राशेजारीच खासगी व्यापार्‍यांचा काटा लावून राजरोसपणे खरेदी सुरू असते. महामंडळाचे कर्मचारी व खासगी व्यापारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने बहुतेक माल हा खासगी व्यापारी खरेदी करतो, तोही कमी भावाने. 

हमीभाव देण्याची मागणी

महामंडळाने सध्या आदिवासी भागातील मोठ्या हिरड्यास प्रतिकिलो 6 ते 8 रुपये, तर बाळहिरड्यास 100 रुपयेे भाव दिला आहे. बाळहिरडा हा वनउपज वनौषधी असून आयुर्वेदात 53 वनौषधांत तो वापरात येतो. या हिरड्यास आजच्या महागाई व दुष्काळी परिस्थितीत 125 ते 150 रुपये हमीभाव असावा, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत. गतवर्षीपासून बाळहिरड्यास महामंडळाने 100 रुपये भाव दिल्यामुळे खासगी व्यापार्‍यांनी 125 ते 150 रुपये भावाने खरेदी दाखविली, तेही बाळहिरडा शेतकर्‍यांकडे संपत आल्यानंतर.