Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Pune › गणेशोत्सवात आता पर्यावरणपूरक वस्तूंचा साज 

गणेशोत्सवात आता पर्यावरणपूरक वस्तूंचा साज 

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आणि समस्त महिलावर्गासह गणेश मंडळांना चिंता लागली ती गणपती उत्सवाची.  गणपती उत्सवात सुशोभीकरणासाठी अनेक वस्तू या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या बनवलेल्या वापरल्या जायच्या. मात्र, या बंदीचा सामना करत उत्सव साजरा करण्यासाठी अनेक  पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. महिलावर्ग घरगुती वापरातूनही अनेक पर्याय सुशोभीकरणासाठी वापरणार आहेत.

आमच्याकडे दरवर्षी दहा दिवस गणपती आणि तीन दिवस गौरी असतात. याकाळात आम्ही दरवर्षी फुले, पाने यांच्या माळा आणि रांगोळया यांचा वापर डेकोरेशनसाठी करत असतो, अशी माहिती  रमा वैद्य यांनी दिली. पूर्वीप्रमाणेच पारंपरिक रंगबेरंगी पडदे, कागद व लाकडापासून बनविल्या जाणार्‍या शोभिवंत वस्तू डेकोरेशनसाठी वापरून थर्माकोल आणि प्लास्टिकला गणेश उत्सवातून हद्दपार करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी सर्वात महत्त्वाचे ठरते ते मखर. थर्माकोलच्या मखरांना पर्याय म्हणून  सध्या बाजारात टिकाऊ आणि आकर्षक  ‘मेटालिक’ची मखरे उपलब्ध आहेत. या मखरांच्या किंमती एक हजारापासून सुरू होत असून त्यांच्या आकारानुसार त्यांच्या किंमती कमी जास्त असणार आहेत. मेटालिक शिवाय पुठ्ठे आणि लाकडाचे मखरही बाजरात उपलब्ध आहेत. या मखरांवर कुंदन, काचा, टिकल्या आणि वेलवेटचे कापड लावून सजावट करण्यात आलेली आहे. या मखरांच्या किंमती कमी असून दिसायलाही ते आकर्षक आहेत.मेटालिकचे मोर व इतर सुशोभिकरणाच्या वस्तूही लक्ष वेधून घेत आहेत. 
राज्य शासनाने 23 जूनपासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला होता. सध्यातरी या बंदीविरोधातील कारवाई संमिश्र स्वरुपात सुरू असल्याचे चित्र आहे.