होमपेज › Pune › पुष्पवृष्टी करीत पर्यावरणपूरक बहुभाषिक कविसंमेलन

पुष्पवृष्टी करीत पर्यावरणपूरक बहुभाषिक कविसंमेलन

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:48PMपिंपरी : प्रतिनिधी

बोलण्यापेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. साहित्यिक हे समाजप्रबोधनातील महत्त्वाचे दुवे असतात, म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने सामान्य माणसांच्या समूहाने वाटचाल केली पाहिजे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ऊर्फ बाळा शिंदे यांनी प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि.2) व्यक्त केले. होळी आणि धूळवडीचे औचित्य साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि हिंदी-उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक बहुभाषिक हास्य व विडंबन कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बाळा शिंदे बोलत होते. 

बीना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक हाजी इक्बालखान यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, माणूस विविध समस्यांमुळे हसणे विसरू नये म्हणून वेगवेगळ्या सणांचे आयोजन प्रत्येक धर्माच्या माध्यमातून केले जाते. आनंद निर्माण करणे हाच प्रत्येक सण-उत्सवाचा उद्देश असतो, असे मत मांडले. याप्रसंगी नगरसेविका शर्मिला बाबर, हिंदी आंदोलनाचे अध्यक्ष संजय भारद्वाज, हास्यकवी बंडा जोशी, कवयित्री मीनाक्षी भालेराव आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे संस्थापक राज अहेरराव यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या पंचवीस वर्षे कालावधीतील उपक्रमांचा आढावा घेतला; तसेच वातावरणनिर्मितीसाठी पावात काय आहे सांगतो तुम्हाला ही हास्यकविता सादर केली.

घातक रसायनांचा वापर करून बनवलेल्या कृत्रिम रंगांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते म्हणून फुलांची उधळण करीत सर्व उपस्थितांनी अनोख्या पद्धतीने कविसंमेलनाच्या उद्घाटनात सहभाग घेतला. हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषेतून गझल, नज्म, गीत, शेरोशायरी, कविता, विडंबन असे विविध प्रकारचे आकृतिबंध सादर करीत सुमारे पन्नास कवींनी ही बहुभाषिक काव्यमैफल उत्तरोत्तर अतिशय रंगतदार केली.

याचा प्रारंभ ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांच्या, ‘याडं लागलं रं याडं लागलं, मोबाईलचं पुरतं याडं लागलं,’ या विडंबनाने झाला. भालचंद्र कोळपकर यांनी, ‘नाच रे नवर्‍या बायकोच्या तालात,’ हे विडंबनगीत सादर केले. अनिल दीक्षित यांच्या ‘जीएसटी’ या हास्यलावणीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय भारद्वाज यांच्या हिंदी काव्यरचनेने श्रोते अंतर्मुख झाले. मीनाक्षी भालेराव यांनी आपल्या अल्पाक्षरी उर्दू रचनांमधून समाजवास्तव मांडले. प्रतिभा श्रीवास्तव यांनी शृंगारिक गीत सादर केले. जिया बागपती यांच्या उर्दू गझलेच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना प्रभावित केले.