Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Pune › भीमाशंकरसभोवतालचे क्षेत्र  होणार ‘इको सेन्सिटिव्ह’!

भीमाशंकरसभोवतालचे क्षेत्र  होणार ‘इको सेन्सिटिव्ह’!

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 1:51AMभीमाशंकर : वार्ताहर

भीमाशंकर अभयारण्याच्या सभोवतालचे क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या आहेत. यामध्ये 37 गावांतील 80.09 चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट होणार आहे. 

यात आंबेगाव तालुक्यातली 455 हेक्टर, जुन्नर तालुक्यातील 75 हेक्टर, तर खेड तालुक्यातील 111 हेक्टर क्षेत्र प्रभावित होणार आहे. तसा प्रस्ताव देखील केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनमंत्रालयास लवकरच सादर केला जाणार आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनप्रमाणेच पश्‍चिम घाटाचा इको सेन्सिटिव्ह झोन तयार केला जाणार आहे. यामध्ये गुजरातपासून केरळपर्यंतच्या पाच राज्यांतील अनेक गावांचा समावेश होणार आहे. 

पश्‍चिम घाटाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अनेक उद्योगधंदे, बांधकामे प्रभावित होणार असून प्रत्येक राज्यातून त्याला विरोध होत आहे. या क्षेत्रात शेती, शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रिय शेती करण्यास काहीच निर्बंध नाहीत. नमूद केलेल्या आठ बाबींवरच निर्बंध असणार आहेत. याबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, अभयारण्यापासून 10 किलोमीटर बाहेर इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्याच्या सूचना होत्या. मी विधानसभा अध्यक्ष असताना ही बाब समोर आली होती. वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिले की, 10 किलोमीटरपर्यंत म्हणजे 500 मीटरसुध्दा असू शकते. त्यामुळे सरसकट 10 किलोमीटर क्षेत्र न घेता पाहणी करून व ग्रामसभा घेऊन हे क्षेत्र ठरविले जावे. यावर परदेशी यांनी हे मान्य करत, तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोनचे क्षेत्र 500 मीटर राहिले. अन्यथा सरसकट 10 किलोमीटर केले असते. तसे झाले असते तर तीन तालुक्यांतील मोठा भाग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट झाला असता.

असे असेल क्षेत्र

भीमाशंकर अभयारण्याचे 130.78 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. यामध्ये 37 गावांतील 65.77 चौरस किलोमीटर वनक्षेत्र, 3.59 संरक्षित वन, 0.22 संपादित वन, 10.51 खासगी व इतर क्षेत्र असे एकूण 80.09 चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट करण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात होणार्‍या या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे आठ बाबींना प्रतिबंधित केले आहे.

या क्षेत्रात याला प्रतिबंध असणार

नवीन प्रदूषण निर्माण करणार्‍या उद्योगधंद्यांची उभारणीस मनाई. जळाऊ लाकडाचा व्यापारी उपयोग. मोठे जलविद्युत प्रकल्प. धोकादायक पदार्थांची निर्मिती आणि वापर. हवाई किंवा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे उडणारे पर्यटन. व्यापारी उद्देशाने खाणकाम. नैसर्गिक पाण्यात मलमूत्र व प्रदूषणयुक्त पाणी सोडणारे प्रकल्प.