Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Pune › ‘प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल फळा हवाच’

‘प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल फळा हवाच’

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

शिक्षण हे केवळ सरकारचे काम नसून समाज जेव्हा त्यात सहभागी होतो तेव्हाच शिक्षण सार्थक होते. साठच्या दशकात शिक्षणाच्या बाबतीत ‘ऑपरेशन ब्लॅकबोर्ड’ अशी घोषणा दिली जात असे. आता प्रत्येक वर्गात ‘डिजिटल फळा’ गरजेचा आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. ‘सरकारने ज्याप्रमाणे ‘एलईडी’ दिव्यांच्या किमती आटोक्यात आणून दाखवल्या त्याप्रमाणे डिजिटल फळ्यांच्या (डिजिटल बोर्ड) किमतीही कमी करून दाखवू,’ असेही ते म्हणाले.

‘रोटरी’तर्फे ‘रोटरी इंडिया लिटरसी मिशन’ या संस्थेच्या माध्यमातून ‘ई-शिक्षा’ हा विशेष प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील 18 हजार 500 सरकारी शाळांना ‘ई-लर्निंग’साठी 37,000 ई-लर्निंग सुविधा देण्यात येणार आहेत. ‘रोटरीतर्फे कर्वेनगर येथील डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे या प्रकल्पाच्या औपचारिक उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जावडेकर बोलत होते. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, ‘रोटरीचे अभय गाडगीळ, शेखर मेहता, ‘रोटरीचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, माजी संचालक अशोक महाजन, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन’चे अध्यक्ष सुदीन आपटे या वेळी उपस्थित होते.