Sat, Sep 22, 2018 01:02



होमपेज › Pune › स्वयंसेवी संस्थेकडून पाहिजे तेथे ‘ई-टॉयलेट’

स्वयंसेवी संस्थेकडून पाहिजे तेथे ‘ई-टॉयलेट’

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:08AM



पिंपरी : प्रतिनिधी

शहरात सर्वत्र शौचालय नसल्याने नागरिकांची विशेषता महिलांची कुंचबणा होते. ही अडचण दूर करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीस आली आहे. पालिका जेथे जेथे जागा उपलब्ध करून देईल, त्या-त्या ठिकाणी संस्था मोफत ‘ई-टॉयलेट’ बांधून देणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. 

‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स ऑफ मुंबई इमेज’ या संस्थेच्या वतीने शहरात मोफत ई-टॉयलेट बांधून दिले जाणार आहेत. तसा प्रस्ताव संस्थेने पालिकेस 3 एप्रिल 2018ला दिला आहे. संस्था टॉयलेट उभारणीचा खर्च ‘सीएसआर’ निधीद्वारे उभारणार आहे. टॉयलेटची उभारणी, त्याची देखभाल व दुरूस्ती तसेच, स्वच्छता, सुरक्षा, वीज बिलाचा खर्च संस्थाच करणार आहे. टॉयलेट नागरिकांना विनामूल्य वापरता येणार आहे. त्यासाठी पालिकेस केवळ जागा उपलब्ध करून देऊन पाणी व ड्रेनेज वाहिनी जोड द्यावा लागणार आहे. पालिकेला त्यासाठी पाणीपुरवठा मोफत द्यावा लागणार आहे. या प्रकारे ई-टॉयलेट उभारणीस सर्वसाधारण सभेने 20 जून 2017 ला मान्यता दिली आहे. 

ई-टॉयलेटमध्ये महिला व पुरूषांचे वेगवेगळे प्रत्येकी एक शौचालय व मुतारी असणार आहे. संस्थेसोबत या संदर्भात 15 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. पालिका ज्या-ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल, त्या-त्या ठिकाणी संस्था नागरिकांसाठी ई-टॉयलेट बांधून देणार आहे. टॉयलेट दुरूस्ती, देखभाल, स्वच्छता आदी खर्च संस्था जाहिरातीच्या उत्पन्नातून मिळविणार आहे. टॉयलेटवर 10 बाय 10 फूट आकाराचे दोन जाहिरात फलक संस्था लावणार आहे.

जाहिरात उत्पन्नातून सदर खर्च केला जाईल. मात्र, जाहिरात कर, परवाना आणि शुल्क आदींमध्ये पालिका कोणतीही सवलत देणार नाही. सदर रक्कम भरणे संस्थेला बंधनकारक आहे. तसेच, पुणे शहरात खासदार निधीतून 10 ई-टॉयलेट उभे केले आहेत. ई-टॉयलेट सर्व बीआरटीएस मार्गावर, चौक, बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. सदर उपक्रमास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.23) होणार्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.