होमपेज › Pune › शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले 

शिवराय समाजकेंद्रित होते म्हणून स्वराज्य झाले 

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:59PMपिंपरी : प्रतिनिधी 

शिवरायांनी निर्माण केलेले राज्य हे व्यक्तिकेंद्रित नव्हते, तर समाजकेंद्रित असल्याने ते स्वराज्य झाले. यामुळे स्वराज्य तब्बल दीडशे वर्षे टिकले. सध्या व्यक्तिकेंद्रित राज्य असल्याचे दिसून येते, असे उद‍्गार माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी काढले.

अखिल मराठा विकास संघ आणि संस्कार सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त वाल्हेकरवाडी येथे डस्टबिन वाटप आणि मराठा भूषण गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.  या वेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ समाजसेवक हणमंत देशमुख, नगरसेवक संजय वाबळे, संस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी बालशाहीर शुभम भूतकरने पोवाडा सादर केला. यानंतर संस्कार सोशल फाउंडेशनच्या वतीने शंभर सोसायट्यांना  कचरा पेट्यांचे (डस्टबिन) व एक लाख गरीब मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले; तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मराठा भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जयंत पाटील म्हणाले,  महाराजांनी 34 वर्षे सर्वोत्तम जाती-धर्माचे राज्य घडविण्यात खर्च केले. महाराज राज्यात कित्येक महिने नव्हते, तरीपण राज्यात अराजकता माजली नाही; कारण हे सर्व जाती-धर्माचे, शेतकरी, व्यापारी या सर्वांचे राज्य होते. सर्व प्रजेला आपले राज्य वाटत होते. राजे सर्व जातींच्या लोकांना प्रिय होते. हा त्यांचा महिमा होता. ते युगपुरुष होते.

श्रीमंत कोकाटे म्हणाले, शिवाजी  महाराज हे जगासाठी एक प्रेरणास्रोत होते. ते केवळ लढाया करीत नव्हते, तर उत्तम प्रशासक, मॅनेजमेंट गुरू होते. शेतकर्‍यांना दु:खी केले नसल्याने त्या काळात शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केली नाही. सुरेश गारगोटे सूत्रसंचालन केले, तर बाळकृष्ण खंडागळे यांनी आभार मानले.