Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Pune › ‘रेरा’तील प्रकल्प वैधतेमुळे ‘बिल्डर’ वठणीवर

‘रेरा’तील प्रकल्प वैधतेमुळे ‘बिल्डर’ वठणीवर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी  

रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती महारेरा पोर्टलवर अगदी सहज उपलब्ध झाली आहे. बांधकाम प्रकल्प वैधतेची माहिती ग्राहकांना अगदी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने मनमानी करणारे बिल्डर वठणीवर आले आहेत. 

ज्या प्रकल्पांची वैधता संपुष्टात आलेली आहे किंवा लवकरच संपुष्टात येणार आहे, अशा प्रकल्पांचा विचार सोडून देऊन उर्वरित प्रकल्पांचा विचार करण्याचा निर्णय ग्राहक जलदगतीने घेत आहेत. महारेरा पोर्टलवर प्रत्येक प्रकल्पाची व्यापक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे घरखरेदी दिवसेंदिवस सोपी होत चाललेली आहे. मनमानी करणार्‍या बिल्डरांना या निर्णयामुळे चाप बसला आहे.   

आपल्याला रेरा नोंदणी प्रमाणपत्र मदत करू शकते. प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाला रेरा नियम 6(अ) नुसार नमुना ‘क’मध्ये नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. हे एकपानी प्रमाणपत्र असून महारेरा पोर्टलवर उपलब्ध असते. नोंदणी प्रमाणपत्रावर अगदी मोजकी परंतु महत्त्वाची माहिती मिळते. प्रमाणपत्रावर अगदी सुरुवातीला प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक असतो. या क्रमांकाद्वारे आपण प्रकल्पाची माहिती आणि त्या प्रकल्पाविरोधात काही तक्रारी झाल्या असल्यास त्याच्या आदेशांची माहिती घेऊ शकतो. ज्या प्रकल्पाविरोधात मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या असतील, अशा प्रकल्पांचा विचार सोडून देणे श्रेयस्कर ठरते. नोंदणी क्रमांकानंतर प्रकल्पाचे नाव आणि प्रकल्पाच्या जमिनीची माहिती असते. या माहितीने आपल्याला प्रकल्पाच्या नावाची आणि प्रकल्पाच्या ठिकाणाची निश्चित माहिती मिळते. त्यानंतर विकसकाचे नाव दिलेले असते.  

विकसकाच्या अनुभवाबाबत माहिती मिळवण्याकरता आपण या नावाचा उपयोग करू शकतो. त्यानंतर खालच्या भागात प्रकल्पाच्या नोंदणीच्या मुदतीबाबत माहिती असते. याद्वारे आपल्याला प्रकल्पाची नोंदणी कधी झाली आणि कधीपर्यंत वैध आहे याची दिनांकासह निश्चित माहिती मिळते. ही माहिती गुंतवणूक आणि खरेदीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. घर खरेदी करताना मुदतीत ताबा मिळणे ही सर्वाधिक महत्त्वाची बाब असते. त्यादृष्टीने आपण प्रकल्प नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रकल्पातील माहितीचा मेळ घालून बघणे आवश्यक आहे. प्रकल्प माहितीत एकंदर प्रकल्प आणि प्रकल्पातील स्वतंत्र इमारती यांचे किती टक्के काम पूर्ण झालेले आहे, त्याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्या आधारे प्रकल्पाचे किती काम शिल्लक आहे? आणि उर्वरित काम नोंदणी प्रमाणपत्रातील वैधतेच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण होणे शक्य आहे का, याचा अंदाज किंवा ठोकताळा घेणे ग्राहकांच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नोंदणी वैध कालावधीत प्रकल्प पूर्ण होणे शक्य असल्यास त्यात गुंतवणूक किंवा खरेदी करावी, अन्यथा जे प्रकल्प वैध कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता वाटत नसेल त्या प्रकल्पांचा विचार सोडून देणे ग्राहकांकरता श्रेयस्कर ठरत आहे. 

गृहकर्ज देताना बँकांचीही सावधानता

ग्राहकांप्रमाणेच बँक आणि वित्तीय संस्थादेखील गृहकर्ज देताना याच स्वरूपाची काळजी घेत आहेत.  ज्या घर खरेदीकरता गृहकर्ज द्यायचे आहे त्याचा खरेदी करार रेरा नोंदणी वैध असताना झालेला आहे की नाही, याची खात्रीवर गृहकर्ज देणार्‍या बँका भर देत आहेत. प्रकल्पाची रेरा नोंदणी संपुष्टात आल्यावर, त्याचे नूतनीकरण न करता, प्रकल्पातील जागांचे व्यवहार करणे गरै आणि बेकायदेशीर ठरत असल्याने, ही काळजी घेणे आवश्यक आहे. याची काळजी न घेतल्यास आणि अवैध घर खरेदीकरता गृहकर्ज दिले गेल्यास त्याच्या वसुलीमध्ये अडचणी येण्याची किंवा ते पैसे बुडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, बँका आणि वित्तीय संस्थांनी याबाबतीत योग्य खबरदारी घेणे पसंत केले आहे.