Mon, Mar 25, 2019 09:51होमपेज › Pune › पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी वाढ जाचक

पाणीटंचाईच्या काळात पाणीपट्टी वाढ जाचक

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:11AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक भागात पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा नीट करता येत नसताना  पाणीपट्टी दरवाढ करणे म्हणजे नागरिकांना जाच केल्याप्रमाणे आहे. पाणीपट्टीमध्ये भरमसाट वाढ करण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रथमपासूनच विरोध आहे, असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी (दि.20) होणार्‍या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढ व मिळकतकराची पाणीपट्टी लाभ करवाढीचा विषय मंजुरीसाठी आहे. यासंदर्भात विचारले असता, ते ‘पुुढारी’शी बोलत होते. बहल म्हणाले की, पाणी ही शहरातील नागरिकांची मूलभूत गरज आहे. महापालिकेस संपूर्ण शहरास समप्रमाणात पूर्ण दाबाने नियमितपणे पाणीपुरवठा करता येत नाही. शहरात एक वेळ पाणी असले, तरी ही बोंब आहे. पाण्यासोबत रस्ते, गटारे, स्वच्छता, मिळकतकर आदींवर महापालिकेने भरसमाट कर अगोदरच लावले आहेत.  त्यात सर्वसामान्य नागरिक पिचला आहे. त्यात पाणीपट्टीत अधिक वाढ करणे जाचक आहे, अशी टीका त्यांनी केली. 

शहरात 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिका करीत आहे;  मात्र प्रत्यक्ष काहीच दिसत नाही. प्रथम संपूर्ण शहरातील नागरिकांना नीटपणे पाणीपुरवठा करावा, त्यानंतर पाणीपट्टी वाढीचा विचार करावा. सर्वसाधारण सभेपुढे ठेवलेल्या पाणीपट्टी व मिळकतकरातील पाणीपट्टी लाभ कराला आमचा विरोध कायम आहे. तो सभागृहातही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्वांत महाग पाणी पिंपरीत : शिवसेना 

शहरातील पाणीपट्टी वाढ ही देशातील सर्वाधिक दराची वाढ आहे. त्यामुळे देशात सर्वांत महाग पाणी पिंपरी-चिंचवड शहरास मिळणार आहे. हा दर बिसलेरी पाण्याच्या बाटलीप्रमाणे होणार आहे. ही शहरवासीयांची थट्टाच आहे. वाकड परिसरात नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने त्या भागातील हौसिंग सोसायट्यांमधील रहिवाशांना बारा महिने टँकरने पाणी मागावावे लागते. महापालिकेचे वेगवेगळे भरमसाट कर भरूनही त्यांना पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. पाणीपट्टी व मिळकतकरातील पाणीपट्टी लाभ करवाढीस शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, असे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले. प्रथम शहरात चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा करून शहरवासीयांना एक वेळ तरी चांगल्या दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.