Thu, Jun 20, 2019 01:45होमपेज › Pune › इंद्रायणी नदीपात्रातील माशांचा अतिदूषित पाण्यामुळे मृत्यू

इंद्रायणी नदीपात्रातील माशांचा अतिदूषित पाण्यामुळे मृत्यू

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 12:53AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

अतिदूषित पाण्यामुळे इंद्रायणी नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील तब्बल 28 कारखान्यांतून रासायनिक पाणीप्रक्रिया न करता थेट नदीत सोडून दिले जात असल्याने, नदी अतिप्रदूषित झाल्याचा आरोप महापौर नितीन काळजे यांनी गुरुवारी (दि.11) केला. त्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या सोबत नदीपात्राची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठ्या संख्येने कारखाने आहेत. या कारखान्यांतून निर्माण होणारे रासायनिक पाणी इंद्रायणी नदीपात्रात प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे पात्रातील जलचर प्राणी व वनस्पती नष्ट होत आहे. माशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत महापौर काळजे यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना घेऊन गुरुवारी मोशी परिसरातील इंद्रायणी नदीपात्राची पाहणी केली. त्या वेळी नदीपात्रात असंख्य प्रमाणात मृत मासे आढळून आले. नदीचे पाणी पुढील गावांतील नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यांच्या आरोग्यासही ही बाब हानीकारक असल्याने महापौर काळजे यांनी रोष व्यक्त केला. 
नदीपात्रात दूषित पाणी सोडणार्‍या परिसरातील सुमारे 28 कारखान्यांवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

महापौरांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे. जलप्रदूषण करणार्‍या कारखान्यांवर त्वरित कारवाई करावी. नदीपात्रात रासायनमिश्रित पाणी सोडण्यास बंदी घालावी, असे महापौरांनी मंडळास दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिकेचे आयुक्त व पर्यावरण विभागासही पत्र देऊन जलप्रदूषण रोखण्याची मागणी केली आहे.