Mon, Jun 17, 2019 18:26होमपेज › Pune › पालिकेची वाहने झालीत बेदरकार!

पालिकेची वाहने झालीत बेदरकार!

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:32AMपुणे : हिरा सरवदे 

बेशिस्त वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहरात पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून विविध नियम करून उपाययोजना केल्या जातात. मात्र, या नियमांना आणि उपाययोजनांना महापालिकेच्या वाहनांकडूनच हरताळ फासला जात आहे. डोळ्यात तेल घालून शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचे नियमन करणारे वाहतूक पोलिस मात्र नियम तोडणार्‍या पालिकेच्या वाहनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात.

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढतच जात आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीचेही प्रमाण वाढतच आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे या वाहतूक कोंडीत वाढच होते. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर जरब बसविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून विविध नियम आणि उपाययोजना केल्या जातात. यामध्ये वेग मर्यादा, एकेरी वाहतूक, नो-पार्किंग, तारखेनुसार सम आणि विषम पार्किंग, उजवीकडे वळू नाका, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक, शांतता क्षेत्रात हॉर्न बंदी, जडवाहनांना बंदी असे अनेक नियम आणि उपाययोजना केल्या जातात. हे नियम वहानचालकांकडून पाळले जाण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन केले जाते. नियम तोडणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा होतो. 

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम तोडू नयेत, यासाठी लाखो रुपये खर्चून प्रबोधनाचे कार्यक्रमही राबविले जातात; मात्र प्रशासनाच्या या सर्व नियमांना आणि उपाययोजनांना महापालिकेच्या वाहनचालकांकडून हरताळ फासला जात आहे. पालिकेची सर्रास वाहने वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. शहरातील कचरा उचलण्यासाठी असलेले कंटेनर अनेक वेळा एकेरी वाहतुकीतून उलट्या दिशेने येत असतात. पार्किंग करण्यास मनाई असलेल्या ठिकाणी पार्क करून चालक गायब झालेले असतात. उजवीकडे वळण्यास बंदी असलेल्या चौकांमध्ये उजवीकडे वळतात. ही वाहने सिग्नल तोडून चौकात घुसखोरी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने सार्वजनिक पार्किंग धोरणाचा घाट घातला आहे. संपूर्ण शहरात पे अ‍ॅण्ड पार्किंग केल्यास नागरिक खासगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील, असा जावई शोध प्रशासनाने लावला आहे. दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य भाग असलेल्या पीएमपी बसचालक  नागरिकांना सक्षम सुविधा देण्यापेक्षा वाहतुकीचे नियम मोडण्यातच धन्यता मानत आहे. बसचालक अनेक वेळा सिग्नल तोडून बस रेटतात. अनेक वेळा सिग्नलला बस थांबल्यानंतर ती झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्यापुढे उभ्या केल्या जातात.  

Tags : Pune, Due, traffic,  vehicles