Wed, Jul 17, 2019 20:12होमपेज › Pune › ‘अभाविप’च्या धमकीमुळे लघुपटाचे प्रदर्शन थांबविले : FTII स्टुडंट फेडरेशनचा आरोप

‘अभाविप’च्या धमकीमुळे लघुपटाचे प्रदर्शन थांबविले

Published On: Sep 06 2018 10:12PM | Last Updated: Sep 06 2018 10:12PMपुणे : प्रतिनिधी

फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय)च्या माजी विद्यार्थी निर्मित केलेल्या लघुपटाचे प्रदर्शन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप)च्या धमकीमुळे प्रशासनाकडून रद्द झाल्याचा आरोप ‘एफटीआयआय’च्या स्टुडंट असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. ही एक स्वतंत्र कलात्मक शिक्षण देणारी संस्था असतानाही अशा प्रकारच्या संघटना हुकूमशाही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या चित्रपटांवर बंदी कशी आणू शकतात? असा सवालही असोसिएशनने उपस्थित केला आहे.

‘एफटीआयआय’च्या शेवटच्या वर्षात असताना हरिशंकर नच्चिमुथ्थू या विद्यार्थ्याने प्रकल्पाचा भाग म्हणून  ‘होरा’ नामक लघुपट निर्मित केला होता. ‘एफटीआयआय’च्या स्टुडंट असोसिएशनतर्फे माजी विद्यार्थ्यांच्या लघुपटाचे  गुरूवारी सायंकाळी ६ वाजता प्रदर्शन करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळी प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव हा चित्रपट रद्द करण्यात आला. मुळात ही फिल्म विभागप्रमुखांकडून शहानिशा करूनच मंजूर झाली होती.

मात्र, असोसिएशनला मिळालेल्या माहितीनुसार, हा लघुपट कबीर कला मंच या सांगीतिक गटाशी संबंधित आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही ‘माओवादी’ फिल्म असल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला हा लघुपट सादर न करण्याची विनंतीवजा धमकी  दिली आहे. मुळातच कबीर कला मंच या संघटनेवर अधिकृतरीत्या कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

या लघुपटात कबीर कला मंचाच्या माध्यमातून सादर झालेले सार्वजनिक कार्यक्रम हे पोलिसांच्या परवानगीनेच झालेले आहेत. यातील अनेक गाणी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी आणि दूरदृष्टीवर आधारित असलेली आहेत, त्यामुळे अभाविपने आरोप केल्याप्रमाणे त्याचा ‘माओवादी’ शी कोणताही संबंध नाही. त्यामुळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या भूमिकेसह प्रशासनाकडून प्रदर्शन रद्द करण्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे असोसिएशनकडून सांगण्यात आलेले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी

गतवर्षी ‘एफटीआयआय’च्या शेवटच्या वर्षात असताना प्रकल्प अंतर्गत हा लघुपट तयार केला होता. कबीर कला मंचामधील एक महिला कलाकार तिचा काहीसा जीवनप्रवास, संघर्ष, आंबेडकरी विचारसरणी, शाहिरी जलसे अशी त्यामध्ये मांडणी करण्यात आली आहे. माओवादाशी त्याचा कोणताही संबंध नाही. हा लघुपट मुळातच न पाहता आरोप करणे चुकीचे आहे. या अशा गोष्टींचा संबंध विनाकारण शहर नक्षलवादाशी जोडला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचाच हा प्रकार आहे.

हरिशंकर नच्चिमुथ्थ्यू , माजी विद्यार्थी, फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया