Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Pune › स्लीपर घातल्याने हॉटेलात प्रवेश नाकारला!

स्लीपर घातल्याने हॉटेलात प्रवेश नाकारला!

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:24AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यासारख्या पुरोगामी शहरात चक्क एका हॉटेलात आलेल्या तरुणाना पायात स्लीपर आणि अंगात शॉर्ट्स घातल्याचे कारणा सांगत प्रवेश नाकारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या पेहरावामुळे तरुणांनाचा चांगल्याच मनस्तापाला समोरे जावे लागले. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 

सेनापती बापट रस्त्यावर आयसीसी टॉवरमधील बी-विंगमध्ये एंजेट जॅक हे रेस्टॉरंट आणि बार आहे. याच परिसरात राहणारे डॉ. अजित वाडिकर व त्यांचे विविध क्षेत्रात काम करणारे सहा ते सात तरुण मित्र मंगळवारी त्यांच्या घरी कामानिमित्त भेटले होते. काम संपल्यानंतर त्यांना जेवण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी गुगल मॅपवरून हॉटेलचा क्रमांक घेऊन संपर्क साधला. त्यावेळी त्यांना रात्री दोन वाजेपर्यंत हॉटेल उघडे असते, असे सांगण्यात आले. त्यामुळे वाडिकर व त्यांचे मित्र हे याठिकाणी साडे आकरा वाजण्याच्यासुमारास जेवण्यासाठी गेले.

त्यादरम्यान त्यांच्यातील दोघांनी अंगात बर्मुडा व पायात स्लिपर घातली होती. हॉटेलात आल्यानंतर त्यांना अंगात बर्मुडा व पायात स्लिपर घातली असल्याच्या कारणावरून प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरशी याबाबत विचारपूस केली. मॅनेजरनेही हेच कारण सांगत प्रवेश नाकारला. परंत, या ग्रुपने हॉटेल चालकांशी संपर्क साधला. मात्र, तरीही त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला फोनकरून घटनेची माहिती दिली. 

त्यावेळी चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व कर्मचारी आले. त्यांनी चौकशी केली. त्यांनाही असेच सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संबंध तरुणांना तुम्ही रितसर तक्रार देऊ शकता, असे सांगितले. त्यानंतर तरुणांनी हॉटेलविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हॉटेल चालकांची ही वर्तणूक मुळातच घटनाबाह्य असून, अशा प्रकारचे खासगी नियम मुलभूत हक्कांवर गदा आणत असल्याचे,  डॉ. अजित वाडिकर यांनी सांगितले. याबबात चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रार अर्ज आला आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.